स्वतः नशामुक्त राहून नशामुक्तीसाठी तृतीयपंथी समाजाने पुढाकार घ्यावा – मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर  trutiypanthi should take initiative for de-addiction - District Collector Rajiv Nivatkar


     मुंबई,फेब्रुवारी१२, २०२१,Team DGIPR - स्वतः नशामुक्त राहून नशामुक्तीसाठी तृतीयपंथी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.तृतीयपंथीयांच्या विविध समस्या आणि व्यसनांसमवेत जोडला जाणारा संबंध यापासून कसे परावृत्त होता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. तृतियपंथीयांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.निवतकर यांनी केले.

    नशामुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून १५ ऑगस्ट २०२० ते ३१ मार्च २०२१ या दरम्यान संपूर्ण भारतात व्यसनमुक्तीचा प्रचार करण्यात येत आहे. या अंतर्गत तृतिय पंथीयांनी स्वतः निर्व्यसनी राहुन याबाबत समूपदेशन, उपचार, प्रचार करावा या उद्देशाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

     यावेळी उपस्थितांनी आजीवन व्यसनमुक्तीची शपथ ग्रहण केली.गोकुळदास रुग्णालयाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. सारिका दक्षिकर यांनी उपस्थित तृतियपंथीयांची जिवनपध्दती आणि त्यांना येणाऱ्या अडीअडचणींवर मात करण्या साठीची मानसिकता विषद केली. मुंबईतील शासकीय रुग्णालये, व्यसनमुक्ती उपचार केंद्रे, समूपदेशन, उपचार पध्दतीची माहिती दिली.

     तृतीयपंथीयांची मुंबईतील लोकसंख्या आणि त्यांना आवश्यक असलेल्या सोई, सुविधा यांची माहिती घेऊन नियोजन करण्यासाठी सर्व्हे फॉर्म भरुन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग, मुंबई शहर, समाधान इंगळे यांनी केले.

    नशाबंदी मंडळ,महाराष्ट्र राज्यच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व चिटणीस अमोल मडामे यांनी मनोगत व्यक्त करतात संस्थेसमवेत राहून आपल्या संपर्कात येणाऱ्यांना व्यसनमुक्त होण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले.

 कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व तृतीयपंथीयांनी  ‘हम होंगे कामयाब’ सामूहिक गीत म्हणत आम्ही व्यसनमुक्तीचा निर्धार केल्याचे सांगितले.
 
Top