एनएचएआयच्या कंत्राटदाराने रस्ते बनविण्यासाठी 24 तासांत सर्वात जास्त सिमेंट वापरण्याचा जागतिक विक्रम केला World record for most cement used in 24 hours to build roads


      पीआयबी मुंबई,०३/०२/२०२१ - एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदाराने २४ तासांत २,५८० मीटर लांबीचा चौपदरी महामार्ग तयार करण्यासाठी सर्वाधिक प्रमाणात रस्त्यांसाठीचे दर्जात्मक सिमेंट वापरण्याचा जागतिक विक्रम केला आहे. ०१ फेब्रुवारी २०२१ ला सकाळी ८ वाजता त्यांनी काम सुरु केले.दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत त्यांनी २,५८० मीटरच्या चौपदरी रस्त्यासाठी म्हणजे सुमारे १०.३२ लेन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण केले.१८.७५ मीटर रुंदीच्या या रस्त्यावर २४ तासांत द्रुतगती महामार्ग तयार करण्यासाठी ४८,७११ वर्ग मीटर क्षेत्रफळावर सिमेंट पसरले. या कामादरम्यान, २४ तासांत सर्वात जास्त – १४,६१३  घनमीटर सिमेंट वापराचा विक्रम प्रस्थापित झाला.

पटेल इन्फ्रास्ट्रक्चर कंत्राटदाराने केला हा विक्रम

       पटेल इन्फ्रास्ट्रक्चर मर्यादित या कंत्राटदाराने केलेला हा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स अशा दोन्ही संस्थांनी प्रमाणित केला आहे.

        हा विक्रम दिल्ली-बडोदा-मुंबई ह्या ८ पदरी हरित द्रुतगती महामार्ग प्रकल्पाचा भाग आहे आणि हा विक्रम करताना जगातील सर्वात मोठ्या, संपूर्णपणे स्वयंचलित,अत्याधुनिक अशा सिमेंट पसरविणाऱ्या यंत्राची मदत झाली.

         प्रतिदिन २८.१६ किलो मीटर या गतीने रस्ते

    महामार्ग निर्माण मंत्रालयाने २०२०-२१ या आर्थिक वर्षात एप्रिल २०२० ते १५ जानेवारी २०२१ या कालावधीत ८,१६९ किलोमीटर लांबीचे रस्ते निर्माण केले, म्हणजेच प्रतिदिन २८.१६ किलो मीटर या गतीने रस्ते निर्माण होत असतानाच हा जागतिक विक्रम झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात, याच कालावधीत, २६.११ किलोमीटर प्रतिदिन या वेगाने ७५७३ किलोमीटर लांबीचे रस्ते निर्माण करण्यात आले होते. रस्ते निर्मितीचा हाच वेग कायम राहिला तर ११ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करायचे सरकारचे लक्ष्य ३१ मार्च पर्यंत पूर्ण होईल.
 
Top