नाशिक,दि.३ फेब्रुवारी २०२१,(जिमाका वृत्तसेवा) -समाजात सेवाभाव रुजविण्यासाठी संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंत महाराज यांच्या जीवना तील त्याग आणि समर्पणाचा आदर्श घरोघरी पोहोचवा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

      सटाणा येथे देवमामलेदार श्री यशवंत महाराज स्मारक नूतनीकरण समारंभ प्रसंगी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, दिलीप बोरसे, आमदार जयकुमार रावल, राजभवनाचे प्रधान सचिव संतोष कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दीघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे,राजभवनाच्या उपसचिव श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नगराध्यक्ष सुनील मोरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, शंकरराव सावंत आदी उपस्थित होते.

      राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, एखाद्या अधिकाऱ्याला देवपण मिळणे फार क्वचित घडते. प्रत्येक व्यक्तीत चांगले आणि वाईट पैलू असतात. आपल्यातल्या देवत्वाला जागृत करण्याचा संदेश सर्व संतानी दिला आहे. हा आदर्श देवमामलेदार यांच्या जीवनातून घ्यावा.त्यांचे चरित्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनादेखील प्रेरणा देणारे असून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण प्रबोधनीत ते पोहचविण्याचा प्रयत्न करु असे सांगितले. देवमामलेदाराच्या जीवन चरित्रावर आधारित लघुपट निर्मितीसाठी निधी देण्याचेही सहकार्य करण्यात येईल, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले.

पुढील पन्नास वर्षांचा विचार करुन स्मारक उभारावे – पालकमंत्री छगन भूजबळ

     पुढील पन्नास वर्षांचा विचार करुन देवमामलेदार यांचे सर्व सुविधांनी युक्त, आकर्षक आणि प्रेरणादायी स्मारक उभारावे, त्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल.अडचणीच्या काळात जनतेची सेवा करणे हे शासन आणि प्रशासनाचे कर्तव्य आहे. हे दोन्ही घटक मुळात जनसेवेसाठी आहेत.संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. शासन निर्णयाचा उपयोग जनतेला होण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडावी याची प्रेरणा देवमामलेदारांच्या स्मारकातून मिळते.या तीर्थ स्थळाला ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात येईल.कोरोनामध्ये सेवा करणारे डॉक्टर आणि पारिचारिका यांच्या सेवाकार्याचा श्री.भुजबळ यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

स्मारकामुळे होईल सटाणा शहराचा विकास- मंत्री दादाजी भुसे

       देवमामलेदार श्री. यशवंत महाराज यांच्या स्मारकामुळे सटाणा शहराचा विकास होईल, असा विश्वास श्री.भुसे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चांगले काम केल्यास जनता देवत्व प्रदान करते हे दर्शविणारे देश पातळीवरील हे एकमात्र उदाहरण आहे. यातून आदर्श घेत जनतेसाठी काम करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. सटाणा शहरातील भूमिगत गटारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करू. जनसेवेचा आदर्श म्हणून हे स्मारक ओळखले जाईल.

डॉ.भामरे म्हणाले,परिसरातील नागरिकांसमोर देवमामलेदार यांच्या कार्याचा आदर्श आहे. जनते साठी काम करणारे जनतेसाठी देवासमान असतात हे त्यांच्या जीवन चरित्रातून स्पष्ट होते.

श्री.रावल म्हणाले, नाशिकला सांस्कृतिक महत्त्व आहे. जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे पर्यंटनदृष्ट्या महत्त्वाची आहेत.

प्रास्तविकात नगराध्यक्ष श्री.मोरे म्हणाले, पालकमंत्री भुजबळ, कृषिमंत्री भुसे, माजी पर्यटन मंत्री रावल आणि खासदार डॉ.भामरे यांच्या प्रयत्नामुळे स्मारक उभे राहिले.हे स्थळ पर्यटना साठी प्रसिद्ध होईल आणि अधिकाऱ्यांना प्रेरणा देणारे राहील.

तत्पुर्वी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी देवमामलेदार श्री यशवंत महाराज मंदिराला भेट देवून दर्शन घेतले.यावेळी राज्यपाल महोदयासह श्री.भुजबळ व श्री.भूसे यांचे देवस्थानच्यावतीने स्वागत करण्यात आले.

श्री यशवंत महाराज यांच्या जीवनातील त्याग, समर्पणाचा आदर्श घरोघरी पोहोचवा Deliver ideal of sacrifice, dedication in life of Shri Yashwant Maharaj from house to house

 
Top