शिवनेरीवरील शिवजन्मसोहळा Shivjanmasohala on Shivneri

  पुणे,DGIPR Team फेब्रुवारी 21,2021- ‘जय भवानी,जय शिवाजी’किंवा ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणा  ऐकल्यावर अंगात वीरश्री न संचारणारा महाराष्ट्रीयन विरळाच!  छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत.देव, देश अन् धर्मासाठी त्यांनी सर्व जाती- धर्माच्‍या ‘मावळ्यांना’ बरोबर  घेऊन गाजवलेला  पराक्रम आजही  प्रेरणादायी आहे.कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर शिवजयंती साधेपणाने परंतु उत्‍साहात साजरी झाली.   पुणे जिल्‍ह्याच्‍या जुन्‍नर तालुक्‍यातील शिवनेरी हे शिवरायांचं जन्मस्थळ.१९ फेब्रुवारी,१६३० साली शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या शिवबानं पुढं हिंदवी स्वराज्य स्थापन करुन सर्वसामान्य  जनतेला दिलासा दिला.छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आठवण राहावी,नव्या पिढीला त्या पासून स्‍फूर्ती मिळावी यासाठी दरवर्षी १९ फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मसोहळा साजरा होत असतो. शिवजयंतीनिमित्त शिवनेरी  किल्ल्यावर जाऊन शिवाई देवीचं आणि शिवजन्म स्थळाचं दर्शन घेणं ही आनंददायी,अविस्‍मरणीय  घटनाच असते!

     महाराष्ट्र हा गड-किल्ल्यांचा प्रदेश! छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या  किल्ल्यांना भेटी देणं आणि इतिहासात रमणं हा वेगळाच अनुभव असतो. पुण्‍याला जिल्‍हा माहिती अधिकारी म्‍हणून आल्‍यानंतर सन २००६ पासून सन २०१० पर्यंत आणि त्‍यानंतर २०१८ पासून २०२१ पर्यंत शिवजयंतीनिमित्त दरवर्षी शिवनेरी  किल्ल्यावर शिवरायांना मानाचा मुजरा करण्याची संधी  मी सोडलेली नाही.तसं म्हटलं तर शिवनेरी किल्ला व परिसर विकास बैठकीच्या निमित्तानं या किल्ल्याला भेट देण्याचा नेहमी योग येतो.

       शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मस्थळास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दरवर्षी अभिवादन करण्यास येतात.यंदाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे  येणार असल्यानं वृत्तांकन आणि चित्रीकरणासाठी जाणं आवश्यक होतं.

       पुण्यापासून शिवनेरीचं अंतर साधारण 80 कि.मी. आहे. शिवजन्मसोहळा सकाळी 9 च्या सुमारास होतो.पायथ्यापासून शिवनेरी किल्ल्या वरील शिवजन्मस्थळापर्यंत जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नाही,त्यामुळं पायी चालण्याशिवाय पर्याय नसतो. या सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही पुण्याहून १९ फेब्रुवारीस पहाटे अडीचच्‍या सुमारास निघालो. नारायणगावजवळ चहा-नाश्‍ता केल्‍यावर जुन्‍नरला सहा वाजेच्‍या दरम्‍यान पोहोचलो.कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर गडावर गर्दी होऊ नये यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घेण्‍यात आली होती.शिवनेरी परिसरात कोणताही अनुचित  प्रकार  घडू  नये  यासाठी  ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

     शिवनेरीच्या पायथ्यापर्यंत शासकीय वाहनानं गेल्यानंतर तिथून पुढचा प्रवास पायी करावा  लागणार होता. त्यामुळं मी,माहिती सहायक गणेश फुंदे, कॅमेरामन संजय गायकवाड, संतोष मोरे, छायाचित्रकार चंद्रकांत खंडागळे,विशाल कार्लेकर, सुनील झुंजार असा आमचा लवाजमा निघाला!

   शिवाई देवी मंदिरातील देवीचं भजन,शिवरायांचा पोवाडा लाऊडस्पीकरमुळं संपूर्ण परिसरात ऐकू येत होता. पोवाड्यामुळं एक वेगळाच उत्साह जाणवत होता.  वरपर्यंत तयार करण्यात आलेल्या  पायऱ्यांवरुन आम्ही गडाकडं कूच केलं. महादरवाजा,गणेश दरवाजा,पिराचा दरवाजा, पालखी दरवाजा,हत्ती दरवाजा,मेणा दरवाजा,  कुलूप दरवाजा असे दरवाजे पार करत असताना  आजूबाजूस लावण्यात आलेली विविध प्रकारची झाडं लक्ष वेधून घेत होती. जुन्नर वन विभागानं  या किल्ल्यावर जांभूळ, साग,काटेसावर,निलमोहर,  कडूलिंब,गुलमोहर,करंज,पायर,बांबू,वड,चिंच,  खैर,वरस,ग्लिरिसिडीया,पळस,चाफा,जास्वंद, बिट्टी अशी अनेक झाडं लावून परिसर शोभीवंत केलेला आहे.या झाडावरील वेगवेगळ्या पक्षांच्या आवाजानं वातावरण आणखीनच भारावून गेलं होतं. प्रत्येक दरवाजावरील फुलांच्या माळा, सजावट किल्ल्याच्या सौंदर्यात भरच घालत होती.  ठराविक अंतरावरील सौरदिवे, कचरा कुंडी, पाने, फुले, फळे न तोडण्याचे आवाहन आणि त्यानुसार किल्ल्याचं  पावित्र्य राखण्याचा मनोदय आपोआप होत होता.

       सकाळी साधारण 7.30 च्या सुमारास आम्ही शिवाई देवी मंदिरात पोहोचलो. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अभिषेक आणि महापूजा केली. त्यानंतर शिवजन्मस्थळी आलो.सकाळी  ८.३०  वाजता शिवाईदेवी मंदिर ते छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. सकाळी पावणेनऊच्‍या सुमारास उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवर हेलिकॉप्‍टरनं आगमन झालं.त्‍यानंतर मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे,पर्यटनमंत्री आदित्‍य ठाकरे यांचंही हेलिकॉप्टरनं आगमन झालं. 

     शिवजन्मस्‍थळी पारंपरिक पध्दतीनं शिवजन्म सोहळयात सहभागी झाल्यानंतर पोलिसांच्या वतीनं हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

      त्‍यानंतर तेजुर ठाकरवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्‍यांनी,वघगाळदरे येथील जय हनुमान लेझीम मंडळाने गोफ नृत्‍याची प्रात्‍यक्षिकं सादर केली. त्‍यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांनी शिवकुंज इमारती तील जिजाऊ आणि बालशिवबाच्या पुतळ्यास अभिवादन केले.

 उपस्थित शिवप्रेमींना संबोधित करतांना मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्‍हणाले,आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवरायांचे अखंड स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते.सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे.छत्रपती दैवत का आहे,तर लढण्या साठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढताना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरवणार असल्याचे सांगितले.

      कार्यक्रमास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे,खा. छत्रपती संभाजीराजे,खा.डॉ.अमोल कोल्हे,आ. अतुल बेनके,आ.विनायक मेटे,जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे,पंचायत समिती सभापती विशाल तांबे, जुन्‍नरचे नगराध्‍यक्ष शाम पांडे, उपनगराध्‍यक्ष दीपेश परदेशी,विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, प्रांताधिकारी सारंग कोडोलकर, तहसिलदार हनुमंत कोळेकर यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

    मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,शिवनेरीवर येण्याचे हे दुसरे वर्ष आहे, हा बहुमान शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे. मनात, ह्रदयात  शिवरायांचे  स्थान आहे. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे. छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका, असा सल्ला त्यांनी दिला.

        उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. छत्रपती शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या शौर्याची, त्यागाची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजां सारखे युगपुरुष, महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आणि त्यांना आदर्श मानणारे कोट्यवधी युवक, आजही गावागावात महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवत आहेत,हे या भूमीचं, आपल्या सर्वांचं भाग्य आहे.कोरोना नियमांचं पालन करुन शिव जयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घरा-घरात, मना-मनात साजरा होऊदे, असे  आवाहन त्यांनी केले.

     शिवजयंती उत्‍सवानिमित्‍त छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्‍कार प्रशासकीय अधिकारी संकेत भोंडवे यांना तर तालुकास्‍तरीय शिवनेरी भूषण पुरस्‍कार सर्पदंश उपचारतज्ञ डॉ. सदानंद राऊत यांना प्रदान करण्‍यात आला. फ्रेरिया इंडिका डालझेल उर्फ शिवसुमन या वनस्पतीची सर्वप्रथम शास्त्रीय नोंद ही डालझेल नावाच्या शास्त्रज्ञाने शिवनेरी गडावरून केली.या वनस्‍पतीच्‍या संवर्धना साठी भारतीय टपाल विभागाने काढलेल्‍या विशेष लिफाफ्याचे प्रकाशनही प्रमुख पाहुण्‍यांच्‍या हस्‍ते झाले.

     साधारण ११.३० च्या सुमारास मुख्य शिवजन्म सोहळा संपन्न झाला. आम्ही सर्वांनी युगप्रवर्तक  छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य प्रेमाची  ज्योत हृदयात सतत तेवत ठेवण्याची शपथ घेतली. याचवेळी गडावर चिंचेचे रोप लावून वृक्षारोपण उपक्रमात सहभाग घेतला. या ठिकाणी ठिबक सिंचनाची सोय केलेली  असल्‍यानं रोप जगण्‍याची खात्री आहे. शिवजन्‍म सोहळा ‘याची देही, याची डोळा’ अनुभवल्यावर आम्‍ही गड उतरायला सुरूवात केली!


राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे
 
Top