नवी दिल्ली,०९/०२/२०२१- राज्यातील आदिवासींच्या हातमागाला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागपूर,भंडारा जिल्ह्यातील हातमाग कारागिरांनी तयार केलेल्या टिशु,टसर, कोसा, सिल्क, कॉटनच्या साड्या,कापड,सलवार-कुर्ती, दुपट्ट्यांना ‘आदि’ महोत्सवात चांगलीच पंसती मिळत आहे.

     येथील आयएनए परिसरातील दिल्ली हाटमध्ये केंद्रीय आदिवासी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास संघाच्यावतीने (ट्रायफेड) 1 फेब्रुवारीपासून ‘आदि’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आदिवासी संस्कृती आणि त्यांनी बनविलेल्या हस्तशिल्प आणि हातमागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘आदि’ महोत्सवाची सुरूवात सन 2017 झाली. या महोत्सवाचे उद्घाटन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले.याठिकाणी सर्वच राज्यातील दालने आहेत.महाराष्ट्रातील एकूण 11 दालनांचा समावेश यामध्ये आहे.

     नागपुरातील परसाराम औद्योगिक हातमाग विणकर सहकारी उद्योगाकडून टिशु आणि टसर धाग्यांचा मिलाफ करून बनविलेल्या साडीला आदि महोत्सवात मागणी असल्याचे प्रवीण बडवे यांनी सांगितले.त्यांची तिसरी पिढी विणकामाचे काम करते.त्यांच्या कलाकृतीला दिल्लीकरांनी पसंती दर्शविली असून त्यांच्या या साडीला मागणी आहे.

     भंडारा जिल्ह्यातील ओरोमीरा महिला वन्य उद्योगाचे भोजराज सोनकुसरे,कोसा हॅन्डलुमचे राजु सोनकुसरे,व्हुमन रूरल डेव्हलपमेंट वेलफेअरचे नारायण बारापात्रे यांची कपड्यांची दालने आहेत. यामध्ये करावती काठी,कोसा,टसर, बाटीक,नागपुरी कॉटन,सिल्क अशा वेगवेगळया प्रकारच्या साडी,कापड,सलवार-कुर्ते, दुपट्टे आदि आहेत.या सर्वांचे पारंपरिक व्यवसाय हा हातमागाचा आहे.शासनाचे सहकार्य असल्यामुळे त्यांना राजधानीत त्यांची कला दाखविण्याची संधी मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृतीचे प्रतीक वारली चित्रकला आणि तारपा या दोन्हींची दालने दिल्ली हाटमध्ये आहेत. वारली चित्रकलेमधील निर्सग आणि जीवनसंस्कृती बघणाऱ्यांचे मन मोहून घेते. येथे येणारे पर्यटक वारली चित्रकलेप्रती जिज्ञासा आणि कुतुहलाने विचारपूस करून खदेरी करीत असल्याचे पालघर जिल्ह्यामधील डहाणूतील वारली चित्रकार दिलीप बाहोठा यांनी सांगितले. डहाणूतीलच वाघह‍डी पोस्ट कसातील आदिवासी युवा सेवा संघाचे दालन येथे आहे. या दालनामध्ये सुंदर वारली नक्षीकाम केलेले पेन स्टँन्ड,टि कप स्टँन्ड,बुके स्टॅन्ड, साडी, बॅग यासोबतच तारपाकृत सौदर्य प्रसाधने आहेत.

     गोंदियातील सालेकसा येथील आदिवासी स्वयं कला संस्थानच्या वतीने येथे खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहे. यांच्या स्टॉलवर वडा पाव, साबुदाणा वडा आणि पुरण पोळी खाण्यासाठी खवय्यांची प्रचंड गर्दी आहे. आदी महोत्सवात दरवर्षी येत असल्याचे संस्थेचे मुन्नालाल ऊईके यांनी सांगितले.

        आदि महोत्सव १५ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.सकाळी ११.०० ते रात्री ०८.०० वाजेपर्यंत सर्वांसाठी माफक शुल्कात खुले आहे.

शासनाचे सहकार्यामुळे राजधानीत त्यांची कला दाखविण्याची संधी Opportunity to showcase their art in capital with cooperation of government

 
Top