शिवजयंतीनिमित्त ‘शिवयोग’ या टपाल विशेष आवरणाचे किल्ले शिवनेरीवर अनावरण On occasion of Shiva Jayanti, a special postal cover called 'Shiva Yoga' was unveiled at Shivneri


     पुणे,दि २१-०२-२०२१-शिवजयंतीनिमित्त ‘शिवयोग : छत्रपती शिवाजी महाराज, शिवसुमन आणि शिवनेरी किल्ला’ या टपाल विशेष आवरणाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते किल्ले शिवनेरीवर अनावरण आणि ‘शिव वृक्ष यज्ञ’ उपक्रमाला सुरुवात झाली.


   बायोस्फिअर्स,उपविभागीय अधिकारी कार्यालय, जुन्नर-आंबेगाव (उपविभाग मंचर),जुन्नर वन विभाग,अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग, पुणे आणि आम्ही भोरकर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ फेब्रूवारी २०२१, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर शिवयोग या टपाल विशेष आवरणाचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार,पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे,खासदार (राज्यसभा) छत्रपती संभाजी राजे,खासदार (शिरूर लोकसभा मतदार संघ) ,डॉ.अमोल कोल्हे, पोस्टमास्टर जनरल,पुणे क्षेत्र, पुणेचे एस.एफ. रिझवी,आमदार अतुल बेनके, बायोस्फिअर्सचे संस्थापक अध्यक्ष,पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ.सचिन अनिल पुणेकर, शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे, विभागीय आयुक्त, पुणे विभागाचे सौरभ राव,पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जुन्नर-आंबेगावचे (उपविभाग मंचर) उप विभागीय अधिकारी सारंग कोडलकर, जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक जयराम गौडा आदींसह शासकीय अधिकारी व शिवप्रेमी पर्यावरण प्रेमी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

     ‘शिवयोग’ या टपाल विशेष आवरणाची पहिली प्रत पोस्ट मास्टर जनरल, पुणे क्षेत्राचे श्री. रिझवी यांनी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना सुपूर्त केली. सदर शिवयोग या टपाल विशेष आवरणाचे प्रस्तावक आणि संकल्पना डॉ. सचिन पुणेकर यांची आहे. सदर विशेष आवरणाच्या प्रस्तावाला भारतीय डाक विभाग, महाराष्ट्र डाक परिमंडल यांची अधिकृत मान्यता मिळाली आहे.

        शिवनेरी किल्ला हा १७व्या शतकातील सैन्य किल्ला आहे. जो की भारतात महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ आहे. जो महान मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. या किल्ल्यात वनस्पतीची गंभीरपणे धोक्यात आलेली, प्रदेशनिष्ठ प्रजाती 'फ्रेरिया इंडिका' आढळून येते, जी शिवसुमन या नावाने लोकप्रिय आहे. शिवसुमन महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाच्या वन-क्षेत्रातील छोटी,जाड-रसाळ वनस्पती आहे, जी की विशेषतः गिरीदुर्गांवर आढळून येते. हे विशेष आवरण छत्रपती शिवाजी महाराज, शिवसुमन आणि शिवनेरी किल्ला यांना 'शिवयोग' म्हणून सन्मानित करण्यासाठी शिवजयंतीचे औचित्य साधून किल्ले शिवनेरीवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.शिवसुमन ही प्रजाती जगात फक्त महाराष्ट्रातील विशेषता सह्याद्री पर्वतरांगां वरील गिरिदुर्ग-वनदुर्ग यांच्यावर आढळ आहे. उदा: शिवनेरी,वज्रगड,पुरंदर,सज्जनगड,चावंडगड, रायगड इत्यादी हि अति धोकाग्रस्त वनस्पती आहे त्यामुळे या विशेष प्रजातीचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. या विशेष आवरणामुळे जनमानसात, अभ्यासकामध्ये, विषेत: टपाल तिकिटांचा संग्राहकामध्ये जनजागृती आणि कुतूहल निर्माण करण्याचे महत्वाचे काम होणार आहे. यानिमित्त सह्याद्रीतील अश्या अनेक दुर्मिळ प्रजातींच्या संवर्धन व संशोधनाकरिता अश्या विशेष आवरणाची भविष्यात नक्कीच निर्मिती करता येवू शकेल. त्यासाठी हे विशेष आवरण नक्कीच पथदर्शी ठरेल.

            या कार्यक्रमाप्रसंगी जुन्नर वनविभागातर्फे मा. श्री. डॉ. अमोल रामसिंग कोल्हे, खासदार (शिरूर लोकसभा मतदार संघ) यांच्या संकल्पने तून ३९१ व्या शिवजयंतीनिमित्त २७ स्थानिक – देशी प्रजातींचा ३९१ वृक्षांचे शिवनेरीवर रोपण देखील करण्यात आले. सदर उपक्रमाला डॉ. पुणेकर यांनी ‘शिव वृक्ष यज्ञ’ म्हणून नामकरण केले आणि वनविभागाच्या सहकार्यातून त्या वृक्षांचा माहिती फलक देखील शिवकुंजवर उभारला. ‘शिव वृक्ष यज्ञ’ उपक्रमाची सुरुवात म्हणून आळंदी येथील सिद्धबेट या पुरातन शिवपीठातील (ज्ञानदेवांची जन्मभूमी, लीलाभूमी, कर्मभूमी) मूळ अजानवृक्षापासून तयार करण्यात आलेल्या अजानवृक्षाचे रोपाचे मुख्यमंत्री व उप-मुख्यमंत्री यांच्या हस्ते रोपण करून करण्यात आली.

          या उपक्रमाला डाक विभागाचे अधिकारी राजगणेश घुमारे,मधुकर गवारी,सुकदेव मोरे,रवि कुमार झावरे ,जुन्नर वनविभागाचे अधिकारी संदेश पाटील, अजित शिंदे आणि शिवभक्त - निसर्गप्रेमी पराग शिळीमकर,दिलीप शिंदे, डॉ.अशोक गिरी, आदर्श गिड्डे, शाहू सावंत,शैलेंद्र पटेल,श्री.आवटे, फिल्याटेलिस्ट डॉ.अजित वर्तक यांचेसह शिव भक्तांचे सहकार्य लाभले.

   या उपक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्तावना डॉ. सचिन अनिल पुणेकर यांनी केली.        
 
Top