वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे दोन दिवसांचे राज्य अधिवेशन २६ जानेवारीला वर्धा येथे होणार

     वर्धा,(प्रतिनिधी),११/०१/२०२१ - लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या वृत्तपत्र क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे यंदाचे राज्य अधिवेशन वर्धा येथे घेण्यात येणार असून तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अधिवेशनाचे संयोजक व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांनी दिली.

राज्य कार्यकारणीची ऑनलाईन बैठक संपन्न

           अधिवेशनाच्या तयारी संदर्भात राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी सरचिटणीस बालाजी पवार,गोरख भिलारे,विकास सूर्यवंशी,दत्तात्रय घाटगे यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोनाविषयक नियम पाळत होणार नियोजन

 या अधिवेशनाचे उद्घाटन ऑल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रिब्युटर्स असोशिएशनचे राष्ट्रीय संयोजक राकेश पाण्डेय (कानपूर उ.प्र.) यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    अधिवेशनाबाबत माहिती देताना पाटणकर यांनी सांगितले की, वर्धा व परिसरात अद्यापही कोरोणाची परिस्थिती पूर्ण नियंत्रणात नाही. त्यामुळे अधिवेशनासाठी उपस्थित राहणाऱ्या संख्येवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. शासकीय नियमांचे पालन करीत व आपल्या सर्व पदाधिकारी विक्रेता बांधवांची काळजी घेत हे अधिवेशन पार पाडावे लागणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाला संख्येबाबत अधिक महत्त्व न देता बऱ्याच दिवसा नंतर आपण एकत्रित येणार असून महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करणार आहोत ही सकारात्मक बाब समजावी. काही प्रश्न प्रलंबित आहेत, त्या वरती चर्चा होऊन पुढील दिशा ठरविली जाईल.

          राज्य संघटनेचे सरचिटणीस बालाजी पवार म्हणाले, अधिवेशनात संख्येबाबत बंधन असल्याने या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण करण्याचा विचार सुरू आहे.अधिवेशन स्थळावरून थेट प्रक्षेपण करावे व प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात एखाद्या सभागृहामध्ये अथवा सोयीच्या ठिकाणी वृत्तपत्र विक्रेते व एजंट यांना एकत्रित करून अधिवेशनाचे प्रक्षेपण दाखवण्यात यावे, असा विचार पुढे आला आहे. 

     या अधिवेशनास उपस्थित राहण्याच्या संख्येवर नियंत्रण असल्यामुळे या अधिवेशनाचे फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण याच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात यावे.हे प्रक्षेपण प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी दाखवावे. तालुका व जिल्हा संघटनांनी आपले पदाधिकारी सदस्य यांना त्याठिकाणी एकत्रित करावे या माध्यमातून एक नवा संदेश व अधिवेशन घेण्या संदर्भात राज्य संघटनेची चिकाटी दिसून येईल अशी सूचना विकास सूर्यवंशी व दत्ता घाडगे यांनी मांडली.

     याशिवाय अधिवेशनाच्या नियोजना संदर्भातील चर्चेत कोषाध्यक्ष भिलारे गोरख भिलारे पंढरपूर, संजय पावशे मुंबई,विनोद पन्नासे चंद्रपूर,रवींद्र कुलकर्णी मालेगाव,सुनील मगर नाशिक, संतोष शिरभाते यवतमाळ,अण्णासाहेब जगताप औरंगाबाद यांच्यासह विविध जिल्ह्यातील राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे वर्धा येथे होणार राज्य अधिवेशन 
state convention of newspaper vendors association to be held at wardha
 
Top