या कार्यामुळेच आज देशाच्या उच्च पदावर विराजमान होण्याची संधी अनेक महिलांना


   पंढरपूर,०५/०१/२०२१-क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या आद्य महिला शिक्षिका असून कवयित्री, समाजसेवक आणि तत्त्वचिंतकही होत्या. त्यांनी सनातनी प्रवृत्तींचा विरोध पत्करून समाज सुधारणेसाठी केलेले कार्य देशातील क्रांतिकारक घटना होय. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांच्या सुधारणेविषयी केलेल्या कार्यामुळेच आज देशाच्या उच्च पदावर विराजमान होण्याची संधी अनेक महिलांना मिळत आहे,असे प्रतिपादन प्रा.डॉ. सुखदेव शिंदे यांनी केले.

    रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात आयोजित सावित्रीबाई फुले यांच्या एकशे नव्वदव्या जयंती समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे हे होते.

 त्यांना मिळणाऱ्या संधी पाठीमागे सावित्रीबाई फुलेंचा त्याग

       डॉ.सुखदेव शिंदे पुढे म्हणाले की,आजच्या एकविसाव्या शतकात महिला प्रगतीची अनेक शिखरे पादाक्रांत करत आहेत.त्यांना मिळणाऱ्या संधी पाठीमागे सावित्रीबाई फुले यांचा त्याग दडलेला आहे.म्हणून महिलांनी सावित्रीबाई फुले होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.समाजातील अनेक पदे त्यांनी भूषवली पाहिजेत.

अजूनही समाजात स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोण पुरेसा विकसित नाही

   अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे म्हणाले की,"क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे खऱ्या अर्थाने आधुनिक कालखंडात महिलांना शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी उपलब्धी निर्माण झाली आहे. अजूनही समाजात स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोण पुरेसा विकसित झाला नाही.त्यामुळेच महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. महिलांमध्ये प्रचंड जिद्द,चिकाटी व धैर्य असते अशावेळी महिलांच्या पाठीमागे ज्योतिराव फुले यांच्यासारखे आपण खंबीरपणे उभा राहण्याची गरज आहे. 

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक समितीचे प्रमुख डॉ.दत्ता डांगे यांनी केले.यावेळी प्रा.सुमन केंद्रे यांनीही विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात गुलाबपुष्प देऊन महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. 

     या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.निंबराज तंटक, अधिष्ठाता डॉ.तानाजी लोखंडे,प्रो.डॉ.हनुमंत लोंढे , डॉ.राजाराम राठोड,कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार डॉ.रमेश शिंदे यांनी मानले.

सावित्रीबाई फुले यांचे कार्य क्रांतिकारक होय - डॉ.सुखदेव शिंदे 
savitribai phules work is revolutionary-dr.Sukhdev Shinde
 
Top