रेशनकार्डाला आधार,मोबाईल लिंकिंग ३१ जानेवारीपर्यंत करून घ्यावे -जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आवाहन,न केल्यास फेब्रुवारीचे धान्य मिळणार नाही
         शेळवे,(संभाजी वाघुले)- जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांनी रेशनकार्डला आधार आणि मोबाईल लिंकिंग ३१ जानेवारी २०२१ पर्यंत त्वरित करून घ्यावे.रेशनकार्ड धारकांनी लिंकिंग न केल्यास फेब्रुवारी २०२१ चे धान्य मिळणार नाही, याची गंभीर दखल लाभार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी

         सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी रेशनकार्डला आधारकार्ड आणि मोबाईल लिंकिंग करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या दि १४ डिसेंबर २०२० च्या परिपत्रका नुसार जिल्ह्यातील सर्व रेशनकार्डधारकांचे स्वस्त धान्य दुकानामध्ये आधार व मोबाईल लिंकिंगचे काम सुरू आहे.

     पुणे विभागाचे उपायुक्त डॉ.त्रिगुण कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन लिंकिंगचे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी जिल्ह्या तील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक घेऊन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत आधार व मोबाईल लिंक करण्याचे आदेश दिले आहेत, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले.

     जिल्ह्यामध्ये अंत्योदय अन्न योजनेचे ५ लाख ३२ हजार ३०८ कार्डधारक असून त्यापैकी ५ लाख ९ हजार ५८८ इतक्या कार्डधारकांनी आधार लिंकिंग केले आहे. यामध्ये २२ हजार ७२० कार्डधारकांचे आधार लिंकिंग प्रलंबित आहेत. प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये २५ लाख ३९ हजार ७३६ इतके लाभार्थी असून १९ लाख २२ हजार २८८ इतक्या लाभार्थ्यांनी आधार लिंकिंग केले आहे. यामध्ये ६ लाख १७ हजार ४४८ लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित असल्याची माहिती श्री.शंभरकर यांनी दिली.
 
Top