पत्रकारितेतून पंढरपूरचं मार्केटिंग व्हावं -अभिजित पाटील


         पंढरपूर (प्रतिनिधी)- राज्याची दक्षिण काशी पंढरपूर तीर्थक्षेत्राचं मार्केटिंग पंढरपूरच्या पत्रकारितेतून होण्याची गरज आहे. येथील पत्रकारांनी हे आव्हान पेलल्यास येथील अर्थकारणास गती प्राप्त होईल आणि निश्चितच त्याचा फायदा येथील सर्वसामान्य जनतेसह पत्रकारांनाही होणार असल्याचे मत उद्योजक अभिजित पाटील यांनी व्यक्त केले. ते पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पंढरपूरमधील कार्यक्रमात बोलत होते.


       यावेळी पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले,श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, युवा नेते प्रणव परिचारक,मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले,उपमाहिती जनसंपर्क कार्यालयाचे अधिकारी अविनाश गरगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

        बुधवार दि.६ जानेवारी रोजी पंढरपूरमधील पत्रकार भवन येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला .पंढरपूर पत्रकार सुरक्षा समिती तसेच पंढरपूर पत्रकार संरक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

         कार्यक्रमाच्या सुरुवातीस आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवर तसेच पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष यशवंत कुंभार आणि संरक्षण समितीचे अध्यक्ष जाकिर नदाफ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राजकीय आणि प्रशासकीय दिग्गजांच्या वैचारिक दृष्टिकोनाची मोठी घुसळण या कार्यक्रमात पहावयास मिळाली.

पंढरपूरचे ब्रँडिंग लेखणीच्या माध्यमातून पत्रकारच करू शकतात

     पंढरपूर आणि येथील पत्रकरिता यासंदर्भात उद्योजक अभिजित पाटील यांनी आपले उद्योगशील विचार व्यक्त केले . येथील पत्रकारिता पंढरपूर तीर्थक्षेत्राचे वैभव वाढविण्यासाठी वापरल्यास, निश्चितच येथील अर्थकारणास गती मिळेल. राज्याची दक्षिण काशी पंढरपूरचे ब्रँडिंग लेखणीच्या माध्यमा तून पत्रकारच करू शकतात . हे सहजसाध्यही आहे. असे झाल्यास येथील अर्थकारणात गती मिळून, याचा फायदा येथील सर्वसामान्यांसह पत्रकारांनाही मिळणार असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले .अल्पावधीतच प्रचंड यश संपादन केलेल्या पंढरपूर तालुक्यातील उद्योजक अभिजीत पाटील यांनी पंढरपूरचे वैभव वाढविण्यासाठी पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे विशद केले. याचवेळी समाजसेवेचा वसा घेतलेल्या पत्रकारांना उद्योजकीय दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहनही केले.

हा विरोध पत्रकारांन समाजहित डोळ्यासमोर ठेवून मांडावा - नगराध्यक्षा साधनाताई भोसले

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी आपला प्रशासकीय दृष्टिकोन व्यक्त केला .समाजाची गरज पत्रकारांनी अवश्य मांडावी. चुकणाऱ्या प्रशासनास जागे करावे. सुधारणा होत असताना कोणाचे तरी हितसंबंध गुंतल्यामुळे यास विरोध होतो आणि हा विरोध पत्रकारांनी समाजासमोर समाजहित डोळ्यासमोर ठेवून मांडावा.मात्र प्रशासनाचे खच्चीकरण होणार नाही याचीही काळजी घेण्याचे आवाहन केले.

आजही शेवटच्या घटकाचा विचार करणारी ही पत्रकारिता तितकीच प्रगल्भ - विठ्ठल जोशी 

    श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी पत्रकारदिनी, पत्रकारांचे चिमटे काढणाऱ्या सामाजिक घटकांबद्दल नाराजी व्यक्त केली.आजची पत्रकारिता तितकीच प्रगल्भ असल्याचे सांगितले. काळानुसार पत्रकारितेत बदल झाले .पूर्वी व्रत समजली जाणारी पत्रकारिता आता नव्या वळणावर येऊन ठेपली आहे आणि तिने वेगळा दृष्टिकोन अंगीकारला आहे. आजही शेवटच्या घटकाचा विचार करणारी ही पत्रकारिता तितकीच प्रगल्भ असण्याचे विठ्ठल जोशी यांनी सांगितले.


   श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या पत्रकारांच्या पाठीशी राहण्याचे अभिवचन दिले.

आधुनिक युगात पत्रकारांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे - प्रणव परिचारक

      आधुनिक युगात पत्रकारांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन युवा नेते प्रणव परिचारक यांनी केले. सर्वच सामाजिक आणि राजकीय धुरिणांना सोबत घेऊन प्रवास करणाऱ्या पत्रकारांच्या पाठीशी हे सर्व घटक कायमच उभे राहतील असा आशावाद व्यक्त केला.

     या पत्रकारदिनाच्या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र सरवदे,डॉ.राजेश फडे,अविनाश साळुंखे,अपराजित सर्वगोड, भगवान वानखेडे,संतोष कांबळे,कबीर देवकुळे,विजय कांबळे, नागेश आदापूरे,सुदर्शन खंदारे,तानाजी जाधव,चैतन्य उत्पात, श्रीकांत कसबे,दत्ता पाटील,ऋषीकेश ननवरे,विरेंद्रसिंह उत्पात, अमर कांबळे,उमेश टोमके,शंकर पवार सर,दिनेश खंडेलवाल, संजय कोकरे,विकास पवार,हरिभाऊ प्रक्षाळे, लखन साळुंखे, कुमार कोरे आदींसह दोन्ही पत्रकार संघाचे बहुसंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र शेवडे यांनी केले. 
 
Top