क.भा.पाटील महाविद्यालयात कविता संमेलन संपन्न

पंढरपूर – बापा लेकीचं जगणं,माय माहेरा असणं,
देतो काळजाचं घड,मन करून दगड
या कवी संभाजी अडगळे यांच्या कवितेने श्रोत्यांची मने जिंकली.निमित्त होते मराठी भाषा संवर्धन दिनाचे.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील मराठी विभाग व महाराष्ट्र साहित्य परिषद, पंढरपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘ऑनलाईन कवी संमेलन’ संपन्न झाले. या संमेलनात कवी सुनील जवंजाळ, कवी सूर्याजी भोसले, कवी संभाजी अडागळे व कवी गणेश गायकवाड यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे होते.

         कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख डॉ. राजाराम राठोड यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाची रूपरेषा सांगून कवितेचे भाषेतील महत्त्व विषद केले.यावेळी त्यांनी स्वरचित कविता सादर केली. ‘अंधारलेली युगे तुम्हीच मुक्त केली, चालुनी अनवाणी वाट, माती मऊसूत केली, टाचातील भेगांना माहित येथील यातना, अण्णा चालून ही धरती, तुम्ही ललामभूत केली’.

      कवी सुनील जवंजाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता सादरीकरणाच्या माध्यमातून केले.कवी सूर्याजी भोसले यांनी ‘पुस्तक’ व ‘मुलगी’ या कवितांचे सादरीकरण केले.‘आधाराचा वड,काळजाचा घड,सावलीचे झाड, मुलगीच’ या कवितेने वातावरण भावूक केले.

      कवी संभाजी अडगळे यांनी ‘घुंगरू’ व ‘लेक’ या कवितांचे सादरीकरण केले.कवी गणेश गायकवाड यांनी ‘माणूस होवू या’ व ‘संस्कार’ या कवितांच्या सादरीकरणातून श्रोत्यांची मने जिंकली. त्यांच्या ‘दिल्या घरी तू सुखी रहा,असा आईने शब्द दिला म्हणून,ती गिळत राहिली आयुष्यभर,न पचणारा घासही’ या कवितेने श्रोत्यांची मने जिंकली.

          मराठी ही आपली मातृभाषा 

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे म्हणाले की,मराठी ही आपली मातृभाषा असून गेल्या हजारो वर्षापासून ती संतांच्या अभंगातून,पंडितांच्या रचनातून, शाहिरांच्या कवनातून आणि शेतकऱ्यांच्या श्रमगीतातून अव्याहतपणे प्रवास करत आली आहे. जगभर पोहचलेल्या मराठी भाषेने जगातील अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. मराठी भाषा ही व्यवहाराच्या भाषेसोबत ज्ञानभाषा झाली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी तिचे संवर्धन केले पाहिजे.”

         या कार्यक्रमात सिनिअर महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व पालक सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. रमेश शिंदे, डॉ. दत्तात्रय डांगे व सुभाष कदम यांनी परिश्रम घेतले.शेवटी म.सा.प.चे कार्यवाहक कल्याण शिंदे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

 कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ऑनलाईन कवी संमेलन 
online kavi sammelan at karmaveer bhaurao patil college 
 
Top