घरगुती वीज बील माफीसाठी पंढरपुरात मनसेचे आंदोलन


पंढरपूर -  घरगुती वीज बिल वसुलीच्या मुद्द्या वरून आज राज्यभरात सरकार आणि वीज कंपनीच्या विरोधात आंदोलने करण्यात आली. पंढरपुरातही आंदोलनाचे पडसाद उमटले. येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वीज वितरण कंपनी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून आंदोलन केले.

      मागील काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी कोरोना काळातील थकीत वीजबील वसुलीसाठी तगादा लावला आहे.त्यातच राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही वीज बिल भरा अन्यथा वीज तोडणी कारवाईला सामोरे जा असे स्पष्ट केले होते.त्यांच्या या वक्तव्यानंतर वीज ग्राहकांनीही तीव्र संताप व्यक्त केला होता .

     महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी व ग्राहकांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जावून आंदोलन केले.

वीज अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार

        निवेदन घेण्यासाठी अधिकारीच उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी वीज  अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून आंदोलन केले.यावेळी कार्यकर्त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत व वीज वितरण कंपनीच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता. त्यानंतर उपस्थित अधिकार्याने निवेदन स्विकारले. 

     यावेळी आंदोलनात मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अनिल बागल, जिल्हा संघटक सागर बडवे,शहर उपाध्यक्ष अवधुत गडकरी,शुभम धोत्रे,प्रथमेश धुमाळ आदींसह मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

घरगुती वीज बील माफीसाठी पंढरपुरात मनसेचे आंदोलन mns agitation in pandharpur for waiver of domestic electricity bills 
 
Top