'कर्मवीर'मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न


पंढरपूर,२९/०१/२०२१ - 'मराठी भाषा ही प्राचीन काळापासून जनसामान्यांची भाषा म्हणून चालत आली आहे.मराठी भाषा ही ज्ञानाने,विद्वत्तेने, साहित्याने समृध्द आहे.ग्रंथनिर्मितीमधून मूल्यांची पेरणी होत असते. शिक्षणातून सुसंस्कारित पिढी घडली पाहिजे.घरातील गृहिणी ही खऱ्या अर्थाने अर्थतज्ज्ञ असते.तिचा संसारातील काटकसरीपणा हा भविष्याच्या गुंतवणुकीचा भाग असतो. ज्याला अर्थकारण जमते त्यालाच व्यवहार कळतात.' असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू तथा रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.अशोक भोईटे यांनी केले.

    रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी त्यांच्या हस्ते प्राचार्य डाॅ.कुंडलिक शिंदे लिखित वित्तीय प्रणाली,स्थूल अर्थशास्त्र, वित्तीय पद्धती या तीन पुस्तकाचे आणि अमित भोरकडे लिखित 'कसे असावे सुंदर अक्षर' या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे हे होते.

सध्या शिक्षणाचे बाजारीकरण मोठ्या प्रमाणात सुरू

    प्राचार्य डाॅ.अशोक भोईटे पुढे म्हणाले की,सध्या शिक्षणाचे बाजारीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शिक्षक आणि प्राध्यापक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. तेथे त्या मुलांना खूप मार्क्स मिळतात.मात्र उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अशी मुले मागे राहतात. मुलांना प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून दिले तर मुले सज्ञान होतात.मराठी साहित्याच्या अभ्यासा तून मूल्ये रुजवली जातात.ग्रंथ लेखनाच्या माध्यमा तून ह्या मूल्यांची रुजवणूक करणे आवश्यक आहे.

सातत्यपूर्ण अभ्यासातून ग्रंथ लिहिले पाहिजेत

      अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे म्हणाले की,शिक्षक आणि प्राध्यापकांनी सातत्यपूर्ण अभ्यासातून ग्रंथ लिहिले पाहिजेत.आपल्या ज्ञानाची,अनुभवाची शिदोरी पुढील पिढीकडे दिली पाहिजे. त्यासाठी मातृभाषा ही महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असते.सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले आहे. त्यातून घडणारी पिढी पाश्चात्य संस्कारात वाढते.त्यामुळे भारतीय प्राचीन संस्कृतीपासून समाज दूर जात आहे.भारतीय संस्कृतीमधील मानवी मूल्ये ही आदर्श आहेत.'

    याप्रसंगी समीक्षा पब्लिकेशनचे प्रकाशक प्रवीण भाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. निंबराज तंटक,उपप्राचार्य डॉ. लतिका बागल,उपप्राचार्य चंद्रकांत रासकर, अधिष्ठाता प्रोफेसर डॉ.तानाजी लोखंडे,रुसा समन्वयक डॉ.बजरंग शितोळे,स्वायत्त समन्वयक डॉ.मधूकर जडल,प्रोफेसर डॉ.हणमंत लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.राजाराम राठोड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अमोल मोरे यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रा. सुभाष कदम यांनी मानले.

मराठी भाषा ही प्राचीन काळापासून जनसामान्यांची भाषा marathi language has been language of masses since ancient times
 
Top