मंगलताई कदम महिला सबलीकरणाची एक चळवळ


सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष मुलाखत        कुर्डुवाडी,(राहुल धोका)- कुर्डूवाडी शहराला कला, क्रीडा,राजकारण अशा विविध क्षेत्रांत शहराची वेगळी ओळख सांगणारा उत्तम इतिहास आहे आणि त्याचे साक्षीदार असणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांमध्ये पुरुषाप्रमाणेच महिलादेखील तसूभरही मागे नाहीत .


        या शहरात अनेक सामाजिक कार्य करणारी सखी महिला मंडळ ही एक अग्रगण्य संस्था आहे. ३५ वर्षापासूनची विविध  उपक्रमातुन आपल्या कार्यशीलतेची साक्ष देणाऱ्या या मंडळाच्या अध्यक्षा,प्रमुख आधारस्तंभ,एक कणखर व्यक्तिमत्व म्हणजेच शिवसेनेच्या प्रथम नगरसेविका सौ. मंगलताई मोहन कदम यांच्याच शब्दात सखी मंडळाच्या वाटचालीचा आणि ताईंच्या यशस्वी कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा अर्थात एक सिंहावलोकन..!


     नमस्कार ,
    सखी महिला मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यास सुरुवात होण्याअगोदर समाजकार्याचा वसा मला लाभला तो आबांकडून म्हणजेच माझे वडील भानुदास बळीराम पवार(वस्ताद) . त्यांचे कार्य थोर आहे,त्यांनी स्वखर्चाने पंजाब तालमीची निर्मिती करून अनेक पहिलवान घडविले ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना केली.कुर्डुवाडी शहरात दरवर्षी शिव जयंती यात्रेचे आयोजन करून कुस्त्यांचे जंगी सामने भरवणे, शिवकालीन ऐतिहासिक प्रसंगाचा सोंगाच्या गाड्यावरून जिवंत नाट्याविष्कार करणे असे उपक्रम राबविले, यासोबतच दिंडीतील हजारो वारकऱ्यांची भोजन व्यवस्था,शेकडो गोरगरीब कुटुंबाच्या लेकी सुनांचे लग्न लावून देणे , मोडणारे संसार वाचविणे,अनेकांचा समस्यांचा न्यायनिवाडा करणे अश्या कितीतरी निस्वार्थ सेवेचे बाळकडू मला लहानपणीच मिळाले,राजकारणा पासून दूर राहून पद,पैसा,प्रसिद्धी याची यत्किंचितही अपेक्षा न ठेवता केवळ समाजकार्य करणाऱ्या आबांचा स्वभाव माझ्या रक्तातच भिणला आहे,त्यामुळे मलादेखील मी राजकारणात येईल अशी कल्पना नव्हती,पण १९८५ साली कुर्डुवाडीमध्ये शिवसेनेची स्थापना झाली , महिला वॉर्डमधून निवडणुकीच्या रिंगणात उभं राहण्या साठी मला अनेक मान्यवरांनी गळ घातली ,खूप मनधरणी केल्यामुळे सर्वांच्या प्रेमाखातर मी तयार झाले आणि निडणुकीत बहुमताने विजयी होऊन शिवसेनेची प्रथम नगरसेविका होण्याचा सन्मान  मला मिळाला .
      

    राजकीय कारकिर्दीच्या या अनपेक्षित कलाटणी मुळे माझा आत्मविश्वास वाढला,या नव्या अधिकाराचा विनियोग मी माझ्या प्रभागात हातपम्पावर मोटर बसवणे,विजेचे खांब लावणे , कचराकुंडी,रस्ते नूतनीकरण अशा कार्यपुर्तीसाठी केला,त्याच दरम्यान नगरपालिकेच्या माध्यमातून ८ मार्च हा जागतिक महिलादिन साजरा करणं सुरु केलं आहे . त्यानिमित्ताने ५ वर्षात अपंग शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे,व्हील चेअर वाटप,मूकबधिर विद्यार्थ्यांना शिलाई  मशीन वाटप,वृक्षारोपण, गरीब महिलांना साड्या,चादर,बेडशीट वाटप , विद्यार्थ्यांना गणवेश,खाऊ वाटप करणे असे  उपक्रम राबविले आणि या सर्व कार्यासाठी श्रीमती अर्चना अरुण शहा (भाभी),सौ.सागरिका शहा यांनी सिंहाचा वाटा उचलला आणि त्यांच्यामुळेच  सखी महिला मंडळाची स्थापना झाली आणि आजही त्यांची साथ कायम आहे . सुरुवातीला केवळ १५ सख्यांचं आमचं महिला मंडळ होतं तसेच सोबतीला सौ.सुलभा दास -दिंडे मॅडम,सौ किरण सुराणा,दमयंती ठोकडे,आशा कऱ्हाडे , वनमाला शेटे ,सरिता गावडे ,उज्वला काशिद , अंजली हुक्केरी,आशा गवळी,देशपांडे काकू , महादेवी ठोकडे,म्हमाणे मॅडम,अनुराधा डिकोळे , सोनिया टमके या मोजक्याच पण समविचारी  सख्यांची लाखमोलाची साथ मिळाली तसेच रिकव लाल शहा कुटूंब ,मंगला भाभी यांचे खूप सहकार्य लाभले .हळूहळू जसजशी कार्याची व्याप्ती वाढत गेली तशी मंडळातल्या सदस्यांची संख्या वाढू लागली आणि पुढे ३५ वर्षे ते कार्य अविरतपणे चालू राहिले.दरम्यान दोन वर्ष महिला व बाल कल्याण समितीचे आणि दोन वर्ष आरोग्य वैद्यकीय समितीचे असे सलग चार वर्ष मी सभापतीपद भूषविले आहे तसेच शिवसेच्या महिला शहराध्यक्षा पदभार असतानाही समाज कार्याची अधिक जबाबदारी मी पार पाडली. 
 
     १५ ऑगस्ट ,२६ जानेवारी रोजी गणवेश आणि खाऊवाटप तसेच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करणे , महिलादिनाच्या निमित्ताने स्त्री अबला नसून सबला आहे,नारीशक्ती ही श्रेष्ठ आहे हे सिद्ध करणाऱ्या, "मुलगी झाली हो..!" सारख्या नाटिका आणि नाटक ,परिसंवाद तसेच स्त्रीभ्रूण हत्या,हुंडाबळी, नशामुक्ती,अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध विषयां वर समाज प्रबोधनपर पथनाट्य सादर करणे, सुदृढ बालक तपासणी,दंत तपासणी,नेत्र शिबीर , मोफत आरोग्य सेवा,किशोरवयीनसाठी समोपदेशन तसेच नृत्य,वक्तृत्व,पाककला रांगोळी, मेहंदी,वेशभूषा,केशभूषा तसेच विविध गुणदर्शन  स्पर्धा भरविणे,पिको फाँल मशीन वाटप तसेच  शिलाई मशीन प्रशिक्षण ,संगणक प्रशिक्षण देणे , हालाखीच्या परिस्थितीतून स्वकर्तृत्वाने डॉक्टर , तहसीलदार,जज्ज,पायलट,पीएसआय झालेल्या    समाजातल्या कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान आणि आदर्श शिक्षिका,आदर्श गृहिणी असा पुरस्कार  दरवर्षी देऊन विजेत्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करून तर कधी कला अभिनय क्षेत्रातून प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या यशस्वी अभिनेत्री यांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण केले गेले. त्यानिमित्ताने सुकन्या कुलकर्णी,अमृता सुभाष , कविता लाड ,नीलम शिर्के,श्रेया बुगडे ,अमित खोपकर ,स्मिता शेवाळे ,भार्गवी चुरमुले अशा  सुप्रसिद्ध अभिनेत्रीनी हजेरी लावली.साडी चोळीच्या ओटीसह त्यांचा झालेला माहेरवासिनी सारखा पाहुणचार पाहून त्याही भारावून जायच्या.
 
 आमच्या सखी महिला मंडळाच्या प्रत्येक कार्याचा डोलारा पेलवण्यासाठी खऱ्या अर्थाने आर्थिक , मानसिक पाठबळ पुरविणारे,सदैव आमचे मनोधैर्य वाढवणारे खंदे व्यक्तिमत्व म्हणजेच धनंजय डिकोळे आणि आमचे प्रेरणास्थान डॉ विलास मेहता आणि कै.डॉ.अरुण शहा यांचे तसेच संतोष शेंडे ,महेंद्र मेहता,दादा डिकोळे ,धनू राऊत ,राहुल शेंडे आणि इतर  सहकारी कार्यकर्त्यांचे आम्ही शतशः ऋणी आहोत त्यांच्याशिवाय आमचे कार्य अपूर्णच राहिले असते .

मंगलताई कदम महिला सबलीकरणाची एक चळवळ 
mangaltai kadam is movement for women's empowerment
 
Top