तर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नाही

   पंढरपूर,ता.२२/०१/२०२१,(नागेश आदापूरे) -डिसेंबरअखेर राज्यात ६३ हजार ७४० कोटी थकबाकी असून,आता जर ग्राहकांनी वीजबिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही,असे महावितरणने म्हटले आहे. परिणामी वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे,थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयास दिले.महावितरणाच्या या धोरणाविरुध्द येत्या २९ जानेवारी रोजी घरगुती व शेतीपंपाच्या थकीत वीजबिल माफीसाठी मनसे च्यावतीने पंढरपूर येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्य़ात येणार आहे असे,मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा शॅडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांनी सांगितले.

साखर कारखान्यांच्या विरोधात त्यांच्या दारात तीव्र आंदोलन

       हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून तहसील कार्यालयावर काढण्यात येणार आहे.बारामती वीज परिमंडळ विभागाने साखर कारखान्यांच्या माध्यमातून वीज बिल वसुलीचा नवा पर्याय वापरून वीज बिल वसुली करण्याचा विचार सुरु केला आहे.वीज वितरण कंपनीच्या या वीज बिल वसुलीला मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. साखर कारखान्यांनी वीज बिल वसुली करुन देण्याचा विचार केला तर साखर कारखान्यांच्या विरोधात त्यांच्या दारात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा शॅडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.

सरकारमधील मंत्र्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही

         श्री.धोत्रे म्हणाले कोरोना,अतिवृष्टी,महापूरामुळे आधीच शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अनेकांचा रोजगार गेला आहे.शेतकर्यांचा शेतीमाल शेतातच सडून गेला आहे आणि शेतीमालाला वाजवी दरही नाही,अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनी आणि राज्य सरकारने शेतकर्यांच्या शेती पंपाचे आणि घरगुती वापराचे विज बील माफ करुन दिलासा देण्याची गरज आहे.उर्जामंत्री आणि सरकारमधील इतर मंत्र्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रालयाने कोणत्याही परिस्थितीत वीज बिल माफीला विरोध दर्शविला असून मंत्रीच वीज बिलाबाबत परस्पर विरोधी विधाने करु लागले आहेत. यामध्ये सर्वसामान्य लोकांची गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोना काळात वीज बिलात सवलत देवू ,त्यानंतर तीन चार टप्यात वीज बिल घेऊ असे म्हणणारे सरकार आता वीज बिल भरा अन्यथा वीज पुरवठा बंद करु अशी धमकी देत आहे.परंतु सरकारच्या अशा धमक्यांना शेतकरी भीक घालणार नाहीत. संपूर्ण वीज बिल माफ करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्यावतीने सरकारच्या वीज बिल वसुलीला विरोध म्हणून पंढरपूरातून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीने वीज बिल वसुली तातडीने थांबवावी अन्यथा मनसे स्टाईलने त्यांना उत्तर दिले जाईल.त्यामुळे पंढरपूर येथून २९ जानेवारी रोजी निघणार्‍या मोर्चास हजारो संख्येने शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मनसेच्यावतीने करण्यात आले आहे .

      साखर कारखानदारांनी वीज वितरण कंपनीच्या वसुली साठी शेतकर्‍यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्या साखर कारखान्यांच्या दारात बसून आंदोलन करु.साखर कारखान्यांनी आधी शेतकर्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे द्यावेत मगच वीज वितरण कंपनीचा बिल वसुलीचा ठेका घ्यावा. ऊस उत्पादक शेतकर्यांच्या उस बिलातून वीज बिलाचा एक रुपयाही वसुल केला तरी कारखाने बंद पाडू असा इशारा दिलीप धोत्रे यांनी दिला.

      यावेळी मनसेच्यावतीने पत्रकार दिन आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने पत्रकारांना तीळगुळ वाटप करुन सन्मान करण्यात आला.यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष सिध्देश्वर गरड,नागेश इंगोले,प्रताप भोसले,प्रथमेश पवार,सागर बडवे,पुजारी,शुभम काकडे ,अनिल बागल,कृष्णा मासाळ,महेश पवार आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .

संपूर्ण वीज बिल माफ करावे या मागणीसाठी मनसेचे आंदोलन maharashtra navnirman sena agitates for waiver of entire electricity bill
 
Top