सोनार परिवाराचा अनोखा उपक्रम

   पंढरपूर,(प्रतिनिधी)- साधारणपणे मकर संक्रांत ते रथसप्तमी या कालावधीत सवाष्ण स्त्रिया एकमेकींच्या जीवनातील सुखदुःख वाटून घेण्याची अनेक वर्षांपासून परंपरा आहे. या परंपरेला अनुसरून आजही अनेक स्त्रिया आपल्या परिसरा तील आणि परिचयातील सवाष्ण स्त्रियांना संसारोपयोगी वस्तू स्नेहभेट स्वरुपात देतात.परंतु या पारंपरिक रितीरिवाजाला काळाची गरज ओळखून आधुनिकतेची जोड देत सोनार परिवारा तील सौ.कल्याणी किरण सोनार व सौ.सविता रवि सोनार यांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सवाष्ण स्त्रियांना वाण म्हणून फेस मास्क स्नेहभेट स्वरुपात दिले.

   सोनार परिवाराने याआधी संक्रांत वाण स्वरुपात वाचन संस्कृती वाढावी म्हणून मान्यवर मराठी साहित्यिकांची पुस्तके तसेच निसर्गातील हिरवाई वाढावी म्हणून हरितक्रांती वृद्धीमध्ये सर्वांचा सहभाग असावा म्हणून संक्रांत वाण स्वरुपात वृक्षांच्या बीजांचे प्रत्येक सवाष्ण स्त्रियांच्या कुटुंबियांना किमान दहा व कमाल शंभर बीजगोळे देऊन ते ओसाड माळरानावर आणि घाटाच्या नागमोडी रस्त्याच्या दुतर्फा पसरवण्यासाठी स्नेहभेट म्हणून दिले आहेत.संक्रांत सणाच्या औचित्याने येथील पालवी संस्थेच्या एक ते पाच वयोगटातील अकरा बालकांना पारंपारिक रुढी परंपरा जपताना बोरन्हाण घातले. 
            
    संक्रांत सणाच्या निमित्ताने आयोजित सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोनार परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.
 
Top