उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, कृषिमंत्री दादाजी भुसे, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि विश्वजित कदम यांची उपस्थिती
पुणे,दि.१८: उपलब्ध बाजारपेठेचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे सांगून उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया, असे आवाहन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.
बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये दि.१८ ते २४ जानेवारी २०२१ या कालावधीत “कृषिक” या कृषि तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषि तंत्रज्ञान सप्ताहास आज ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील,सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे,आमदार रोहित पवार, भारतीय अनुसंधान परिषदेचे महासंचालक त्रिलोचन मोहपात्रा(ऑनलाईन), राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, उपसंचालक सुरेश चौधरी, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार व सुनंदा पवार, बायर कंपनीचे डॉ. सुभाष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व सॉलिडारिडार, आशिया या संस्थांमध्ये करण्यात आलेल्या कराराच्या (एमओयु) प्रतीचे हस्तांतरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेच्या ५० वर्षातील वाटचालीविषयी बनविण्यात आलेल्या चित्रफितीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
खासदार शरद पवार म्हणाले, गहू, तांदळाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे.बाजार पेठेनुसार शेती पिके घेतल्यास उत्पादनाला चांगला भाव मिळतो. यासाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध डाळी व फळपिकांचे उत्पादन देखील शेतकऱ्यांनी घ्यायला हवे. शेतीसाठी ‘पाणी’ हा घटक महत्त्वाचा आहे. शेतीसाठी किती प्रमाणात आणि कशा प्रकारे पाण्याचा वापर करायचा याची माहिती शेतकऱ्यांना होणे आवश्यक असते. या दृष्टीने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर ‘कृषिक’ सप्ताहाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली, असे सांगून खासदार शरद पवार म्हणाले, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विस्ताराचे काम दिवंगत आप्पासाहेब पवार यांनी केले, तर संस्थेत आधुनिकता आणण्यासाठी राजेंद्र पवार यांनी परिश्रम घेतले.संस्थेला ५० वर्षे पूर्ण होत असून संस्थेच्या वाटचालीसाठी अनेक मान्यवरांचे सहकार्य मिळाल्याचेही खासदार श्री.पवार यांनी आवर्जून सांगितले.
शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी राज्याचा कृषी विभाग प्रयत्नशील –कृषिमंत्री दादाजी भुसे
कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले, बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करुन दिली जात आहे. याच पद्धतीने राज्यातील अन्य भागातील शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती उत्पादन व शेती तंत्रज्ञानाची माहिती करुन देण्यासाठी राज्या तील चारही कृषी विद्यापीठांमध्ये ‘कृषी तंत्रज्ञान सप्ताह’ सुरु होण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. शेतकरी बांधवांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबवण्यात येत आहेत. माती परीक्षण करुन त्या-त्या भागातील मातीनुसार शेतीमध्ये खते वापरण्याबाबतचे फलक लावण्यात येत आहेत. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास निश्चितच मदत होईल. महाडीबीटी पोर्टलवर एकाच अर्जाद्वारे कृषी विभागाच्या अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे, असे सांगून कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने “विकेल ते पिकेल” ही संकल्पना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेऊन ते गतीने सोडवण्यासाठी विविध कक्ष स्थापन करण्यात येत आहेत.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन शेतीविषयक विविध औजारे,तंत्रज्ञान व शेती उत्पादनांच्या प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. यानंतर डेअरी प्रकल्प केंद्राला भेट देऊन येथील विविध सोयी-सुविधांची पाहणी केली. माळेगाव खुर्द येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेला (एनआयएएसएम) भेट देऊन पाहणी केली. यावेळी खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मान्यवरांनी नियोजित सायन्स पार्कला भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रात्याक्षिकांची पाहणी करुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
दुष्काळ निवारण यंत्रणेचा आढावा
राज्यात दुष्काळ निवारणाच्यादृष्टीने आवश्यक उपाय योजनांबाबत कार्यक्रमात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. दुष्काळ निवारण यंत्रणेचा आढावा, भारतीय कृषी संशोधन परिषदेची दुष्काळ निवारण यंत्रणेशी प्रतिबद्धता, दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी भात, ऊस पिकांसाठी पाणी वाचवण्याच्या दृष्टीने लागवड तपासणी, दुष्काळ सूचक यंत्रणा, पुणे जिल्ह्यासाठी मृदा सर्वेक्षण व भूमी वापर नियोजन आदी विषयांवर डॉ.सुहास जोशी, डॉ.हिमांशू पाठक, डॉ. सचिन नांदगुडे, डॉ. सुनील गोरांटीवार, डॉ.विवेक भोईटे, सारंग नेरकर, डॉ.बी.एस द्विवेदी आदी तज्ञ मान्यवरांनी सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले.
“कृषिक” कृषी तंत्रज्ञान सप्ताहाला सुरुवात
राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधक संस्था, अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि बायर कंपनी यांच्या प्रयत्नातून हा कृषि तंत्रज्ञान सप्ताह पार पडत आहे. दरवर्षीच्या कृषिक प्रदर्शनातील प्रक्षेत्र भेटीसह फूड प्रोसेसिंग, डेअरी टेक्नॉलॉजी, प्रक्रिया उद्योग, मार्केटिंग ब्रँडिंग आदी तंत्रज्ञानाचा यात समावेश आहे. याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण खाद्य पदार्थांच्या प्रक्रिया उद्योगांचे लाईव्ह डेमो पाहता येत आहेत. याठिकाणी कृषी तंत्रज्ञानासह शेतीविषयक विविध प्रयोगांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर आदी खबरदारी घेऊन याठिकाणी शेतकऱ्यांना प्रवेश देण्यात येत आहे.
कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे - खासदार शरद पवार krushi vigyan kendra should guide farmers - mp sharad pawar