स्वतःचे प्राण धोक्यात टाकून एकाचे प्राण वाचविणाऱ्या रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल सुजीतकुमार निकम यांचा गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

 ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीद वाक्याला अनुसरून पोलीस बांधव कर्तव्य करतात

मुंबई,दि.०३/०१/२०२१- ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीद वाक्याला अनुसरून पोलीस बांधव आपले कर्तव्य करत असतात. त्यातून जेव्हा एखादे मानवतावादी कामगिरी त्यांच्या हातून घडते त्यावेळेस पोलिसांचा, त्यांच्या कामगिरीचा मला प्रचंड अभिमान वाटतो, असे भावोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज काढले.
पोलीस कॉन्स्टेबल सुजीतकुमार निकम यांनी प्राण वाचवले
रेल्वे पोलिस दलातील पोलीस कॉन्स्टेबल सुजीतकुमार निकम यांनी स्वतःचे प्राण धोक्यात टाकून दहिसर रेल्वे स्थानकावर एका ६० वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचवले. त्याबद्दल त्यांचा सत्कार आज ज्ञानेश्वरी बंगला येथे करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

दहिसरची घटना
१ जानेवारी रोजी साठ वर्षाचे गणपत सोलंकी हे दहिसर येथून खारला जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे होते. त्यावेळी दोन नंबर प्लॅटफॉर्मवरून स्लो लोकल जाणार होती, ती पकडण्यासाठी फ्लाय ओव्हर ब्रिजचा वापर न करता रुळावर उडी मारून धावत दुसऱ्या बाजूस असलेली लोकल पकडण्याचा त्यांचा विचार होता. त्यानुसार त्यांनी रूळावर उडी मारली. परंतु विरुद्ध दिशेने येणारी फास्ट लोकल पाहता ते गांगरून गेले त्यांना परत फलाटावर चढता येत नव्हते.हे दृश्य तिथे कर्तव्या वर असलेले पोलीस शिपाई सुजीतकुमार यांनी पाहिले.परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गणपत सोलंकी यांना फलाटावर ओढून घेतले व त्यांचा जीव वाचविला. त्यानंतर त्यांच्या मुलाला बोलवून त्यांना सुपूर्द केले.या कामगिरीबद्दल निकम यांचा सत्कार आज गृहमंत्र्यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केला. यावेळी रेल्वे पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार उपस्थित होते.
कुटुंब प्रमुख म्हणून अभिमान
 पोलीस दलातील शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत उत्तम काम करणाऱ्या तसेच समाजाप्रती आपला वेगळा ठसा उमटवून पोलीस विभागाचे नाव उंचाविणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गृहमंत्र्यांनी नेहमीच सन्मान केला आहे. कोरोना योद्धे,अद्वितीय काम करणाऱ्या नवदुर्गा, कर्तव्य दक्ष पोलीस कर्मचारी या सर्वांचा सन्मान गेले वर्षभर वेगवेगळ्या माध्यमातून गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला आहे. राज्यातील सव्वा दोन लाख पोलीस कर्मचाऱ्यांचा गृहमंत्री या नात्याने कुटुंब प्रमुख म्हणून पोलीस बांधवांचे मनोबल वाढवणे, त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करणे, त्यांच्या सुख दुःखाची दखल घेणे हे आपले कर्तव्य व आपली ती नैतिक जबाबदारी असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सातत्याने सांगतात.

पोलीस बांधवांच्या मानवतावादी कामगिरीचा सदैव अभिमान – गृहमंत्री अनिल देशमुख 
home minister anil deshmukh always proud of humanitarian work of police
 
Top