शुभेच्छा पत्र’ या उपक्रमाची तपपूर्ती

           कोल्हापूर, कवितासागर वृत्तसेवा, ०१/०१/२०२१- विंग,तालुका - कराड, जिल्हा - सातारा येथील बाबा शामराव पवार (जन्म ०५ जून १९६३) यांनी समाज प्रबोधन आणि समाज जागृती करण्याच्या उद्देशाने समाजातील वास्तव दर्शविणारे काव्य आणि त्यातील आशय प्रकट करणारी चित्ररचना या दोन्हींचा अनोखा संगम साधून शुभेच्छा पत्रे तयार करून ती भारतातील विविध मान्यवरांना देण्याचा देशातील पहिला आणि एक अनोखा उपक्रम २००९ साली सुरू करून २०२१ पर्यंत सातत्याने सलग बारा वर्षे चालू ठेवला आहे. ‘शुभेच्छा पत्र’ या उपक्रमाची आज तपपूर्ती झाली आहे. बाबा शामराव पवार हे सध्या ओंड शिक्षणमंडळ, ओंड द्वारा संचलित पंडित गोविंद वल्लभपंत हायस्कूल, ओंड, तालुका-कराड,जिल्हा - सातारा येथे मागील ३५ वर्षांपासून कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.  


बाबा शामराव पवार यांच्या या उपक्रमाची सुरुवात सन २००९ साली

         बाबा शामराव पवार यांच्या या उपक्रमाची सुरुवात सन २००९ साली ग्लोबल वॉर्मिंगबद्दल जगभर होत असलेल्या चर्चेमुळे झाली.त्यांनी तात्काळ या विषयासंदर्भात माहिती मिळवण्यास सुरुवात केली आणि त्याचे गांभीर्य ओळखून आपणही कलाकार म्हणून समाज प्रबोधन करावे या हेतूने चित्र रेखाटण्याचे ठरविले. निसर्गच आपल्याला सांभाळतो हे दर्शविणारे सुंदर पेंटिंग त्यांनी तयार केले. या पेंटिंगवर एक सुंदर बोधवाक्यही असावे यासाठी त्यांनी चार ओळी लिहिल्या, त्यापुढेही त्यांना आणखी चार ओळी सुचल्या. असे करत एक सुंदर काव्यरचना तयार झाली आणि चित्र व काव्य या दोन्हीच्या समन्वयातून शुभेच्छा पत्र तयार करावे व त्यातून समाज प्रबोधन साधावे, असे त्यांना वाटले आणि या उपक्रमाचा प्रारंभ झाला. पुढच्या वर्षी नववर्ष आणि संक्रांत सण यायच्या आधीच समाजातील मान्यवरांच्या छान प्रतिसादामुळे या वर्षीही आपण शुभेच्छा पत्र बनवावे असे त्यांना मनोमन वाटले. २०१० साल पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास यावरती चर्चा करण्यासाठी गाजले. म्हणून धरणीच्या कुशीतच आपण वाढतो हे सांगणारे ‘मानवतेचा संदेश’ या संकल्पनेवर आधारित दुसरे पेंटिंग त्यांनी तयार केले. अशा प्रकारे प्रत्येक वर्षी त्या वर्षातील ठळक घटना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी चित्र व काव्यरचना तयार केल्या. असा हा अनोखा उपक्रम सातत्याने गेली बारा वर्षे ते चालवत आहेत.


या वर्षाचा सन २०२१ च्या काव्यमय शुभेच्छा पत्राचा विषय ‘आगंतुक’ अर्थात कोरोना

    या वर्षाचा सन २०२१ च्या काव्यमय शुभेच्छा पत्राचा विषय ‘आगंतुक’ अर्थात कोरोना असा आहे. याचसाठी बाबा शामराव पवार यांच्या या विशेष उपक्रमाची नोंद ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणून करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् चे मुख्य संपादक आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. बाबा शामराव पवार यांच्या नावावर नोंदवल्या गेलेल्या या विशेष राष्ट्रीय विक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बाबा शामराव पवार यांच्या उपक्रमाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद 
baba shamrao pawars initiative is recorded in maharashtra book of records
 
Top