महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्रधानमंत्री बॅनरच्या उपविजेत्याचा मान


नवी दिल्ली, दि.२९  : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या प्रधानमंत्री बॅनरचे उपविजेते पद पटकाविले आहे  तर पुण्याची कशीष मेथवानी एनसीसीच्या एअर फोर्स विंगची सर्वोत्तम कॅडेट (बेस्ट कॅडेट) ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे दोन्ही बहुमान आज महाराष्ट्राला प्रदान करण्यात आले .


येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅली मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते प्रधानमंत्री बॅनरच्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या लष्कर,नौदल आणि वायुदलातील प्रत्येकी एक मुलगा व मुलगी अशा बेस्ट कॅडेट्सला सन्मानीत करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चिफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपीन रावत, लष्कर,नौदल आणि वायुदलाचे प्रमुख, संरक्षण सचिव आणि एनसीसीचे महासंचालक यावेळी उपस्थित होते.


       यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्राप्त उपविजेत्यापदाचे चषक नाशिक येथील भोसला सैनिकी महाविद्यालयाचा कॅडेट तथा सिनीयर अंडर ऑफिसर उपकार ठाकरे याने स्वीकारले. देशातील एकूण १७  एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० मधील विविध स्तरावरील मुल्यांकन तसेच यावर्षी १ ते २८ जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबीरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारा वर आज प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्राला उपविजेत्या पदाचा तर आंध्रप्रदेश व तेलंगना संचालनालयास विजेते पदाचा बहुमान देण्यात आला. महाराष्ट्राने यापुर्वी १७ वेळी प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान पटकाविला आहे.

यावेळी वायुदलाच्या बेस्ट कॅडेट्सचा बहुमान पटकाविणा-या पुणे विद्यापीठाच्या इंस्टिटयूट ऑफ बायो इन्फॉर्मेटीक अँड बायो टेक्नॉलॉजीची विद्यार्थीनी वॉरंट ऑफिसर कशीष मेथवानी चा पंतप्रधानांच्या हस्ते मानाचे पदक व केन प्रदान करून सन्मान करण्यात आला. एनसीसी वायुदलाच्या बेस्ट कॅडेटसाठी देशातील एकूण १०० कॅडेट्समध्ये चुरस होती. लेखी परिक्षा, समुह चर्चा आणि एनसीसी महासंचालकांसमोर प्रत्यक्ष मुलाखत व शिबीरातील परेड या निकषांवर बेस्ट कॅडेट्ची निवड करण्यात आली.

महाराष्ट्राची उत्कृष्ट कामगिरी

         कर्नल प्रशांत नायर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या एनसीसी संघाने यावर्षी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दिल्लीतील कँन्टॉनमेंट भागात आयोजित एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबीरात महाराष्ट्रातील १६ मुल व १० मुली असे एकूण २६ कॅडेट्स सहभागी झाले.पुणे येथे २६ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर २०२० दरम्यान या कॅडेट्सचा कसून सराव झाला व कोरोना चाचण्याअंती हे कॅडेट्स १ जानेवारी २०२१ रोजी दिल्लीतील शिबीरात सहभागी झाले. प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या पथ संचलनात सहभागी देशभरातील एनसीसीच्या 100 मुलींच्या तुकडीत महाराष्ट्राच्या १० ही मुलींची निवड झाली.विशेष म्हणजे या मुलींच्या तुकडीचे नेतृत्व महाराष्ट्राच्या संघातील जळगावच्या मुलजी जेठा महाविद्यालयाची विद्यार्थीनी सिनीयर अंडर ऑफिसर समृध्दी संत ने केले. राजपथावर महाराष्ट्रातील 16 पैकी 11 मुलांची निवड राजपथवरील पथ संचलनासाठी झाली.

       याशिवाय वायुदलाच्या बेस्ट कॅडेट्समध्ये पुण्यातील श्री शिवाजी सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी विवेक सिंगने दुसरे स्थान तर नौदलाच्या बेस्ट कॅडे्टसमध्ये पुण्याच्याच मॉर्डन महाविद्यालयाच्या तनाया नलावडेने दुसरे स्थान पटकाविले.

पुण्याची कशीष मेथवानी ठरली देशातील सर्वोत्तम कॅडेट Kashish Methwani of Pune became best cadet in country

 
Top