वृक्ष लागवड आवड किंवा छंद नव्हे तर गरज 

   मुंबई - वृक्ष लागवड ही आवड किंवा छंद म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात वृक्ष लागवडीची मोठी मोहीम सुरू करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी लिहिलेल्या “एक हरित चळवळ,वृक्षलागवडीचा महाप्रयोग” या पुस्तकाचे प्रकाशन करताना केले.

पर्यावरण रक्षणाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य

      पर्यावरण रक्षणाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून त्यामुळेच आपण आरेचे ८०० एकरचे जंगल जपण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. वाढत्या जागतिक तापमानाला रोखण्यासाठी,प्रदूषण कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्यात वृक्ष लागवड महत्त्वाचा विषय असून केवळ आवडीचा नाही तर गरजेचा विषय झाला आहे.या वाटेवरून पुढे जाताना हे पुस्तक हरित महाराष्ट्राच्या निर्मिती साठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 

    या प्रकाशनासाठी खासदार विनायक राऊत, मुख्य सचिव संजय कुमार,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष सिंग,मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जराड, श्री.खारगे यांच्या पत्नी श्रीमती मिनाक्षी खारगे, मुले व्यंकटेश आणि मनिष खारगे, वन विभागातील अधिकारी अरविंद आपटे आदी मान्यवर उपस्थित होते.

तर डोंगरावर हिरवा शालू आपण निर्माण करू

     यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाने आपल्याला त्याचे परिणाम- दुष्परिणाम दाखवले पण काही चांगल्या गोष्टीही दाखवल्या. या काळात प्रदूषण कमी झाल्याने मोर रस्त्यावर नाचल्याचे आपण पाहिले. त्यामुळे प्रत्येकाने प्रदूषण कमी करण्यासाठी जे जे काही करता येईल ते करणे गरजेचे आहे.पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्याचा प्रयत्न करताना वनवैभव जपायचे आणि वाढवायचे आहे. जिथे आपण झाड लावू शकतो म्हणजे जिथे जागा आणि पाणी आहे तिथे वृक्ष लागवड झाली पाहिजे. यासाठी डोंगरावर जलसंधारणाची कामे हाती घेणे,वृक्षलागवडीची मोहीम जोमाने पुढे नेण्याची गरज आहे असे झाले तर डोंगरावर हिरवा शालू आपण निर्माण करू शकू असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

अंदाजे ४०० कोटी वृक्ष लावणे आणि ते जगवणे आवश्यक

   कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विकास खारगे यांनी ते वन विभागात प्रधान सचिव म्हणून कार्यरत असताना करण्यात आलेल्या महावृक्षलागवडीचा अनुभव आणि हे पुस्तक लिहिण्यामागची आपली भूमिका विशद केली. ते म्हणाले, राज्याचे सध्याचे वनक्षेत्र २० टक्के आहे ते ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी अंदाजे ४०० कोटी वृक्ष लावणे आणि ते जगवणे आवश्यक आहे.एकट्या वन विभागा कडून हे काम होणे शक्य नसल्याने व्यापक लोकसहभाग मिळवत वन विभागाने वृक्षलागवड महाप्रयोग हाती घेतला होता. यात पारदर्शकता जपताना विविध प्रोत्साहनात्मक योजना राबविण्यात आल्याचेही ते म्हणाले. वन विभागाने ६५ लाखांची हरित सेना निर्माण केली. कन्या वन समद्धी योजनेतून मुलीच्या जन्माचे स्वागत करताना १० वृक्ष लावण्याचा संस्कार रुजवला. रानमळा पॅटर्नमधून जन्मवृक्ष, शुभमंगल वृक्ष,स्मृती वृक्ष अशा जीवनातील प्रत्येक सुखदु:खाचा प्रसंग आणि त्या आठवणी वृक्ष लावून जपण्याचे आवाहन करण्यात आले. यात राज्य आणि केंद्र शासनाचे विविध विभाग, सामाजिक, स्वयंसेवी, अध्यात्मिक संस्था, सिनेक्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, प्रसार माध्यमे, लोकप्रतिनिधी अशा सर्वांचा सहभाग होता.काटेकोर नियोजन, पूर्व तयारी करत हरित महाराष्ट्राची ही चळवळ लोक चळवळीत रुपांतरीत करण्यात यश मिळाल्याचे व भारतीय वन सर्वेक्षण अहवालातून या वृक्ष लागवडीच्या फलनिष्पत्तीचे निष्कर्ष दिसून आल्याचेही ते म्हणाले.

एक हरित चळवळ,वृक्षलागवडीचा महाप्रयोग Ek harit chalval,vruksh lagvadicha mahaprayog
 
Top