बिबट्या वांगी व परिसरातील गावे सोडून गेल्याची अद्यापही खात्री नाही

  करमाळा,जि.सोलापूर,१५/१२/२०२०- मागील तीन दिवसांमध्ये दिनांक १३,१४ व १५ डिसेंबर रोजी बिबट्याचे वास्तव्य वांगी किंवा परिसरातील गावांमध्ये असल्याचे जरी दिसून आले नसले तरी बिबट्या या परिसरातून बाहेर गेल्याचे देखील कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे वांगी परिसरातील गावाच्या शिवारातील ग्रामस्थांनी अजूनही सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. त्याच बरोबर हा परिसर सोडून बिबट्या पांगरे, सांगवी, कविटगाव किंवा त्या परिसरातील इतर गावात गेला असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.म्हणून ढोकरीपासून वांगी, पांगरे ते कंदर पर्यंतच्या सर्व गावातील व शिवारातील ग्रामस्थांनी बिबट्याच्या संदर्भात असलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी शार्प शूटरची व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घेऊन तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करुन शर्थीचे प्रयत्न करत आहेत.काल रात्री ठीक १०.०० वाजता धेर्यशील पाटील,डीसीएफ,सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली चारचाकी गाडीच्या टपावर मचाण तयार करून शार्प शूटर डॉ चंद्रकांत मंडलिक तसेच वनरक्षक एस.ए.कळसाईत पहाटे ४.०० वाजेपर्यंत बिबट्याच्या हालचाली मॉनिटर करण्यासाठी ढोकरी व बिटरगाव शिवारात बसले होते. सर्च लाईट मारणे कामी वनरक्षक संतोष मुंढे तसेच डॉट एक्स्पर्ट अनिल अवचिते हे त्यांना मदत करत होते. या टीमला कव्हर करण्यासाठी वन खात्याची दुसरी टीम रवींद्र गावते यांच्याबरोबर १०० मीटर अंतरावर कार्यरत होती. भयाण काळोख्या रात्री गर्द ऊस व केळीच्या बागायती रानामध्ये बिबट्याला पकडण्याच्या किंवा ठार करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन वरील सर्वजण रात्रभर जागूनदेखील त्या परिसरात बिबट्याच्या हालचाली किंवा अस्तित्व जाणवले नाही म्हणून वरील टीमने पहाटे ४.०० ते ५.३० पर्यंत ढोकरी, बिटरगाव, वांगी परिसर तसेच शेलगावपर्यंत रस्त्याने नाईट सर्च केला. या काळात त्यांना कोठेही बिबट्याच्या हालचाली आढळून आलेल्या नाहीत.

ज्या नरभक्षक बिबट्याच्या शोधासाठी वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच शार्प शूटर व पोलीस खात्याच्या मदतीने स्वतःचे कुटुंब कोसो दूर असताना,स्वतःच्या जिवाची पर्वा न करता दिवसा तील अठरा ते वीस तास राबत आहेत. त्यांचे मनोबल उंचावण्याच्या दृष्टीने त्या त्या भागातील ग्रामस्थांनी व सुजाण नागरिकांनी त्यांना नैतिक पाठिंबा देणे गरजेचे असतानादेखील काही लोक बेजबाबदारपणे, स्वतःची नैतिक जबाबदारी विसरून, सवंग लोकप्रियतेसाठी त्या टीमवर बेछूट आरोप करत आहेत. काल तर ढोकरी परिसरात एका व्यक्तीने वनविभागाच्या महिला अधिकाऱ्याला असभ्यपणे बोलल्याची माहिती मिळाली असून संबंधित महिला अधिकारी कर्तव्यावरून करमाळा येथे निघून गेल्याची देखील चर्चा ऐकण्यात आली आहे. अशा वक्तव्यामुळे वनखात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे तसेच शार्प शूटर यांचे मनोधैर्य कमी होत आहे असल्याची माहिती आहे.

     जंगली प्राण्यांमध्ये बिबट्या हा अत्यंत हुशार, चपळ व शागीर्द प्राणी असून बिबट्या असलेल्या परिसरामध्ये त्याचा शोध घेणे व बंदुकीने त्याला टिपण्यासाठी अत्यंत धाडस व उच्च मनोबलाची आवश्यकता असते हे मी स्वतः चिखलठाण नंबर १, शेटफळ व सांगवी नं.३ येथील केळीच्या बागेमध्ये व उसामध्ये शार्प शूटर डॉ चंद्रकांत मंडलिक यांच्या सोबत राहून अनुभवले आहे. बिबट्यासमोर कोणत्याही चुकीला क्षमा होऊ शकत नसल्याने अत्यंत एकाग्रचित्ताने व डोळ्याची पापणीही लवणार नाही याची दक्षता घेऊन काम करावे लागते. अशा नरभक्षक बिबट्याला टिपण्यासाठी वनखात्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यां सोबत जे शार्प शूटर व पोलीस खात्याचे अधिकारी कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांना सुजान ग्रामस्थांनी साथ देणे अत्यंत आवश्यक आहे. 

मी वर केलेल्या विवेचनाची सर्व ग्रामस्थ दखल घेतील व बिबट्याच्या शोधासाठी आम्हा सर्वांना नैतिक पाठिंबा देऊन मदत करतील ही एकच रस्ता अपेक्षा !

श्रीकांत पाडुळे ,पोलीस निरीक्षक
करमाळा पोलीस ठाणे,जि.सोलापूर 

बिबट्या वांगी व परिसरातील गावे सोडून गेल्याची अद्यापही खात्री झालेली नाही It is yet to be ascertained whether the leopard has left Wangi and surrounding villages
 
Top