भोसे ग्रामपंचायत विरोधी गटाने घेतला उमेदवारी न देण्याचा निर्णय

पंढरपूर,३०/१२/२०२०,(प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी ग्रामपंचायतीपाठोपाठ भोसे ग्रामपंचायत निवडणूकही बिनविरोध होणार असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत एकही उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय , सत्ताधारी पाटील विरोधी गटाने मंगळवारी घेतलेल्या बैठकीत जाहीर केला आहे.विरोधी गटाच्या या निर्णयामुळे भोसे ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रवास बिनविरोधच्या दिशेने सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.या निर्णयामुळे गावातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

      त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा
मंगळवारी येथील रायगड मंगल कार्यालयात, भोसे परिवर्तन पॅनलची बैठक पार पडली.यावेळी या पॅनलचे प्रमुख प्रा. महादेव तळेकर , मार्गदर्शक हनुमंत मोरे यांनी ही भूमिका जाहीर केली त्यामुळे भोसे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले. कोरोना महामारीने भोसे गावात मोठी मनुष्यहानी झाली.अनेक लहानथोर मंडळी गावाने गमावली आहेत. यामुळे या गावावर पसरलेली शोककळा अद्यापही कायम आहे , या शिवाय राजे छत्रपती खासदार संभाजी महाराज यांनी ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आणण्या साठी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत भोसे परिवर्तन पॅनल या निवडणुकीत आपला एकही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणार नसल्याचे प्रा.महादेव तळेकर यांनी जाहीर केले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असे म्हणता येणार असून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार याची खात्री पटल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

विरोधी गटाच्या या पवित्र्याने गावचे राजकीय वातावरणच बदलले

      भोसे ग्रामपंचायतीची मागील निवडणुक मोठी अटीतटीची झाली होती. चालू निवडणूकही मोठी रंगतदार होणार ,अशी चर्चा भोसे परिसरात रंगली होती. यातच पाटील विरोधी गटाने अचानक घेतलेल्या पवित्र्याने या गावचे राजकीय वातावरणच बदलून टाकले आहे .

भोसे ग्रामपंचायतीवर अनेक वर्षापासून कै. राजूबापू पाटील यांच्या गटाची सत्ता आहे . मागील निवडणुकीत यास छेद देत, भोसे परिवर्तन पॅनलने निकराची झुंज दिली होती. १७ उमेदवारांपैकी १ उमेदवारही निवडून आणला होता. मतांच्या टक्केवारीतही वाढ झाली होती. एकूणच निवडणूक मोठी रंगतदार झाली होती. चालू निवडणूकही अटीतटीची होईल अश्या चर्चा भोसे गावात रंगल्या होत्या. या चर्चांना पाटील विरोधी गटाने घेतलेल्या निर्णयामुळे पूर्णतः पूर्णविराम मिळाला आहे. कोरोना महामारीत या गावचे राष्ट्रवादीचे नेते कैराजूबापू पाटील यांच्यासह जवळ जवळ ४५ लहानथोर मंडळी काळाच्या पडद्याआड गेली,यामुळे गावावर मोठी शोककळा पसरली आहे.तोंडावर येऊन ठेपलेली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा गावातील अनेक बुजुर्ग मंडळींनी बोलून दाखवली होती. यातच दोन दिवसापूर्वी छत्रपती खा. संभाजीराजे यांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्या संबंधी आवाहन केले होते . या सर्व बाबींचा विचार करून,पाटील विरोधी गटाने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे या गटाच्या बैठकीत जाहीर करण्यात आले .

     या बैठकीस भोसे परिवर्तन पॅनलचे मार्गदर्शक हनुमंत मोरे, पॅनल प्रमुख महादेव तळेकर,भास्कर तळेकर,हरिचंद तळेकर, अजय जाधव, विलास तळेकर ,विलास कोरके,बाळासाहेब कोरके, ॲड. रमेश कोरके,राजकुमार टरले,अनिल बोराडे, औदुबर थिटे,बाळासाहेब थिटे,नवनाथ माळी, नवनाथ सुरवसे,अविनाश नाईकनवरे आदी उपस्थित होते.

 आता सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही विरोधी पक्षांने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून सत्तेत सर्व समावेशक ग्रामपंचायत होण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे. केवळ विरोधासाठी विरोध यामुळे गावाचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे बिनविरोध निवड हा निर्णय कौतुकास्पद आहे.  

 भोसे ग्रामपंचायत बिनविरोध निवडीच्या दिशेने
 Towards Bhose Gram Panchayat Unopposed Election
 
Top