बेजबाबदार सहकार मंत्र्यांनी राजीनामा द्यावा - प्रभाकरभैया देशमुख


 शेळवे (संभाजी वाघुले) राज्याचे सहकार मंत्री यांनी ऊस दराच्या एफआरपी बाबत अद्यापही ब्र  शब्दही काढला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हे साखर कारखानदार ऊस दरावरून शेतकऱ्यांची चेष्टा करत आहेत. त्यामुळे अशा बेजबाबदार सहकारमंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा असे प्रतिपादन जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकरभैया देशमुख यांनी केले.
 

   साखर कारखानदारांकडे अडकलेले पैसे आंदोलन करून मिळवून दिल्याबद्दल पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील शेतकऱ्यांच्या वतीने जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकरभैया देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी जनहितचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत निकम, नामदेव काळे महाराज,जिल्हा युवकाध्यक्ष श्रीकांत नलवडे, युवक तालुकाध्यक्ष नाना मोरे,मोहोळ तालुका उपाध्यक्ष शिवाजी जाधव,विठ्ठल कोळी शिरगिरे,पांडुरंग गुंड,दत्तात्रय गायकवाड,औदुंबर गायकवाड, महादेव गायकवाड,कल्याण कदम, महादेव रोकडे, रवींद्र बिस्किटे,गणेश उरवणे, सर्जेराव पाटोळे आदी उपस्थित होते.प्रास्ताविक औदुंबर गायकवाड यांनी केले. 

आता शेतकऱ्यांनीच कारखानदारांना शिस्त लावली पाहिजे. शेतकऱ्यांच्या घामाच्या दामासाठी शेतकरी संघटना जीवाचं रान करीत आहेत. पण शेतकऱ्यांची एकजूट नाही.त्याचा गैरफायदा   कारखानदार घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनीच  एकजूट होऊन आंदोलनात उडी घेत कारखानदारांना शिस्त लावण्याची वेळ येऊन ठेपली आहे. - औदुंबर गायकवाड, शेतकरी,रोपळे
 पुढे बोलताना देशमुख म्हणाले की,येत्या आठ दिवसात ऊस दर जाहीर करावा अन्यथा जिल्ह्या तील साखर कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारून सर्वच कारखाने बंद पाडणार आहे .राजू शेट्टी हे राज्याचे नेते आहेत. त्यांनी फक्त कोल्हापूर जिल्ह्याची बैठक न लावता राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी असतानासुद्धा कोणताही नेता त्यावर बोलायला सुद्धा तयार नाही,माझ्या आंदोलनाची सुरुवातच भीमा कारखान्यापासून झाली आहे. त्यामुळे माझ्यावरील आरोप खोटे आहेत.उरलेले पैसे कारखानदारांनी न दिल्यास पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे,असेही देशमुख यांनी सांगितले. 

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजनाथ रणदिवे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी व शेतकरी यांनी परिश्रम घेतले.
 
Top