कुर्डुवाडी शहरातील प्रा.प्रमोद शहा अशक्य ते शक्य करणारे जादूगार

     कुर्डूवाडी,(राहुल धोका),दि २५/१२/२०२०- प्रा.प्रमोद शहा हे श्रेष्ठ श्रावक जैन मंदीर संस्थापक रावजी शहाचे नातू आणि शहराचे माजी नगराध्यक्ष व २० वर्षे नगरसेवक असलेले स्व. कांतीभैचे सुपुत्र.

        प्रा.प्रमोद शहा हे काशिनाथ भिसे काँलेजचे प्राध्यापक. प्रा.प्रमोद शहा १९७४ ते २०१४ तब्बल ४० वर्ष अर्थशास्त्र शिक्षण देणारे प्राध्यापक.त्यांच्या बद्दल त्यांचे विद्यार्थी प्रा.मारुती अभिमान लोंढे यांनी प्रा. प्रमोद शहा यांच्या लिहिलेले हे पत्रच त्यांचेविषयीचे बोलके वास्तव होय

      चंद्रभागेच्या वाळवंटात भगव्या झेंड्याखाली अध्यात्माची लोकशाही समजावून सांगणारी संत मंडळी महाराष्ट्रामध्ये होऊन गेली. सर मी आपणास शिक्षण क्षेत्रातील खूप मोठा संत मानतो.

गावकुसाबाहेर राहणाऱ्या सर्वसामान्य मुलाला देशाच्या बाहेर शोधनिबंध सादर करण्यासाठी पाठवण्याचे सामर्थ्य प्राध्यापक प्रमोद शहा या हाडाच्या शिक्षकाकडेच आहे.ज्या लोकांचे आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात गेलं त्या घरात माझ्या सारखा अत्यंत सर्वसामान्य मुलगा जन्माला आला. पिढ्यानपिढ्या आमच्या दारिद्र्यात गेलेल्या, शिक्षणाचा कसलाही गंध नाही .दहावी, बारावी आणि बी.ए.या परीक्षा मी काठावर पास झालो. परंतु एम.ए.करत असताना शहा सरांचा जास्तीचा सहवास लाभला. तसा बीए चा देखील मी त्यांचाच विद्यार्थी..... प्रचंड अडचणी येत असतानादेखील जीवनामध्ये कधी हार म्हणायची नाही.

      अडचणींना कधी घाबरायचं नाही.कारण प्रत्येक अडचण किंवा प्रत्येक समस्या ही उत्तर सोबत घेऊन जन्माला येत असते, हे शहा सरांनी वारंवार मनावर बिंबवले. बीए पास होण्याची शाश्वती नसताना आज एमए ,एम फिल , जी.डी.सी.अँन्ड ए.आणि सलग पाच वेळा नेट परीक्षा उत्तीर्ण झालो. ६३ शोधनिबंधाचे लेखन व सादरीकरण केले, एवढेच नाही तर जीवनामध्ये सर्वात अवघड वाटणारा अर्थशास्त्र या विषयाची मी २८ पुस्तके लिहिली.विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झालो.आकाशवाणीवर मुलाखती झाल्या.माझ्या लेखणीला केवळ आणि केवळ बळ हे शहा सरांमुळेच मिळाले आणि सर आज गुरुदेव कार्यकर्ता म्हणून मला श्री स्वामी विवेकांनंद शिक्षण संस्थेमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली यापेक्षा माझे मोठे भाग्य काय असू शकते. 

       माझ्यासारखी अनेक सर्वसामान्य मुलं शहा सरांमुळे जीवनामध्ये यशस्वी झाली. प्राध्यापक तर खुप झाले.सर माझ्यासारख्या अनेक मुलांच्या हृदयामध्ये आपण घर करून राहिलात.आपण खुप साऱ्या लोकांचे प्रेरणास्थान आहात. आज अनेक विद्यार्थी चांगल्या पदावर काम करताना दिसत आहेत. सर ईश्वर हा निराकार निर्गुण आहे..... त्याला साकार सगुण व्हायचे असेल तर आपल्या सारख्या देवदुताच्या माध्यमातुन तो साकार होत असतो...... सर आपण अनेक संघर्ष करणाऱ्या विदयार्थांचे दीपस्तंभ बनुन राहिलात....  अनेक विदयार्थ्यासाठी आपण हिरवळीची जागा बनलात.... म्हणून आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये विसावू शकलो ,श्वास घेऊ शकलो .

   आपणास निरोगी व उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

प्रा.मारुती अभिमान लोंढे
 रामकृष्ण परमहंस महाविद्यालय ,उस्मानाबाद 
(एक आठवण -आठवणीतील व्यक्तीमत्व) 

कुर्डुवाडी शहरातील प्रा.प्रमोद शहा अशक्य ते शक्य करणारे जादूगार  ...
prof. pramod shah from kurduwadi city-magician who makes impossible possible ...
 
Top