कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध होणार ?

खर्डी,(अमोल कुलकर्णी),२५/१२/२०२०-जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील खर्डीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी लगबग सुरू झाली आहे.त्यासाठी लागणारी कागदपत्रे काढणे,जातीचे टोकन काढणे,बाकी भरणे आदीसाठी रीघ लागली आहे.विद्यमान ग्रामपंचायत ही परिचारक गटाच्या ताब्यात आहे. जागतिक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भालके व परिचारक गटांच्या चर्चा आणि बैठकी झाल्या. परंतु शिवसेना पक्षाकडून (आवताडे गट)काही जागांची मागणी झाली. जागावाटपाचा तिढा न सुटल्यास ग्रामपंचायत निवडणूक लागणार हे अटळ आहे.
"बिनविरोध,जागावाटप वगैरे प्रश्न आमचे पक्ष प्रमुख निर्णय घेतील मी काही बोलू शकत नाही"
- प्रणव परिचारक,उपसरपंच खर्डी
ज्यांनी कधी विजयाचा गुलाल पाहिला नाही ते बिनविरोध करण्याच्या तयारीत
तालुक्यातील राजकीय वातावरण पाहता कै. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक व कै. आमदार भारत भालके हे दोघेही हयात नाहीत. त्यामुळे आपण कोण ? कोणाला विरोध करावा ? आणि कशासाठी करावा ?यावर चर्चा रंगत आहेत. ज्यांनी कधी विजयाचा गुलाल पाहिला नाही ते बिनविरोध करण्याच्या तयारीत आहेत मात्र सत्ताधारीही आम्ही काही कमी नाहीच्या नादात चार ते सहा सीट गमावण्याची शक्यता आहे.
"आम्हाला निवडणूक लढवण्याचे आदेश वरून आहेत त्यामुळं बिनविरोध हा विषयच नाही"- दत्तात्रय यादव,शिवसेना

काही चुकांमुळे तितकीशी सोपी निवडणूक राहिलेली नाही
यापूर्वी अतिक्रमण हटवण्यात झालेल्या दुजाभावामुळे किंवा विकासकामात झालेल्या काही चुकांमुळे तितकीशी सोपी निवडणूक राहिलेली नाही म्हणून चुरस ही दिसून येत आहे.
गावात वेळ देऊन जातीने लक्ष देऊन, विकास निधी वापरून, गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तरुणांनी एकत्र येऊन अपक्ष पॅनल तयार केलं आहे,लढणार तर आहेच!"
- धनंजय रोंगे, अपक्ष

उमेदवार आपल्या खिशाचा अंदाज घेताहेत

    ग्रामपंचायतीचे कामे,विविध योजना,उमेदवार निवडीबाबत "गृहीत धरणे", भेट टाळणे,वेळ न देणे,आयारामाना लाभाची पदे देणे,ग्रामसभा न घेणे या पद्धतीला कंटाळून काही तरुणांनी अपक्ष पॅनल लढवण्याची तयारी चालवली आहे. जागा वाटपामध्ये मतभिन्नता झाल्यास यावेळी ग्रामपंचायती मध्ये तिरंगी लढतीचा सामना पाहावयास मिळणार असल्याची चर्चा आहे. सरपंच पदाचे आरक्षण हे निवडणूक निकालानंतर असल्यामुळे उमेदवार आपल्या खिशाचा अंदाज घेत आहेत. सामान्य मतदारांना मात्र या वेळेस निवडणूक लागावी, पार्ट्या मिळाव्यात,काही "आर्थिक प्राप्ती"व्हावी अशी अपेक्षा आहे.

       तालुक्यातील राजकीय पटलावरील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या खर्डी ग्रामपंचायतीत बिनविरोध सत्ता स्थापन होते का तिरंगी लढतीतून कोणाला किती जागा मिळतात ? पुन्हा परिचारक गट आपला बालेकिल्ला राखतो का ? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.या निवडणुकी वर पुढील पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि आगामी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाची विधानसभा निवडणूक लक्षात घेता बरीच राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान सत्ताधारीही परिस्थिती कशी हाताळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

खर्डीतील राजकीय वातावरण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे तापले 
political atmosphere in Khardi heated due to grampanchayat elections
 
Top