समताधिष्ठित समाजव्यवस्थेच्या निर्माणासाठी महात्मा फुले यांची बंडखोरी     पंढरपूर ,१४/१२/२०२० - "महात्मा ज्योतिराव फुले हे शोषणाच्या विरोधात होते. तत्कालीन धर्माच्या बळावर बहुजन वर्गाचे शोषण करणाऱ्या प्रस्थापित प्रवृत्तीच्या विरोधात त्यांनी बंडखोरी केली.मानवी हिताच्या विरोधात असणाऱ्या विषमतेचा त्यांनी धिक्कार केला. समाज निर्माणासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक धर्माची स्थापना केली. यात त्यांनी उदारमतवादी आणि मानवतावादी दृष्टीकोनाचा समावेश केला. मानवतेच्या विरोधात असणाऱ्या रूढी-परंपरांना नाकारण्याचे काम त्यांनी केले. वयाच्या पंधराव्या वर्षापासून प्रस्थापितांच्या विरोधामध्ये संघर्ष करणारे महात्मा फुले हे आधुनिक समाजरचनेचे पुरस्कर्ते ठरतात." असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. टी.एस.पाटील यांनी केले.

शेतकर्‍यांविषयी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याची समकालीन प्रासंगिकता

   रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रुसा कॉम्पोनंट आठ अंतर्गत महात्मा ज्योतीराव फुले व खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'शेतकर्‍यांविषयी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याची समकालीन प्रासंगिकता' या विषयावर घेण्यात आलेल्या वेब सेमिनारमध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे हे होते. 

       प्राचार्य डॉ. टी.एस.पाटील पुढे म्हणाले की, "रयत शिक्षण संस्था ही महात्मा फुले यांच्या विचारांवर उभारली असून महात्मा फुले यांनी सर्व समावेशक समाज निर्मितीचे पाहिलेले स्वप्न डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाहू वसतिगृहाच्या माध्यमातून पूर्ण केले. त्यांचा जाती निर्मूलनाचा विचार हा त्यांच्या एकूण साहित्यातील महत्त्वाचा विचार होय. तत्कालीन इंग्रज सरकारला प्राप्त परिस्थितीची जाणीव करून देऊन शेतकऱ्यांच्या सुधारणेसाठी आणि शैक्षणिक सुधारणेसाठी महात्मा फुले यांनी आग्रह धरला."

शेतकरी विकास हा महात्मा फुले यांच्या विचार व कार्याचा केंद्रबिंदू

       यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मानव्यशास्त्रे विभागाचे अधिष्ठिता डॉ. विकास कदम म्हणाले की, "शेतकऱ्यांचे खाजगी सावकारीच्या माध्यमातून होणारे शोषण थांबविण्यासाठी महात्मा फुले केलेल्या उपाययोजना अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्यांनी शेतकरी शहाणा बनण्यासाठी शिक्षणाची असणारी आवश्यकता प्रभावीपणे मांडली.अज्ञान अंधकारात अडकलेल्या शेतकऱ्यास ज्ञान प्राप्ती झाली तर शोषण थांबण्यास मदत होईल. शेतकरी विकास हा महात्मा फुले यांच्या विचार व कार्याचा केंद्रबिंदू होता."

त्यामुळे शेती आणि शेतकरी यांचा विकास हा समाजाच्या केंद्रस्थानी असला पाहिजे

         अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे म्हणाले की,"महात्मा फुले व राजर्षी शाहू महाराज यांनी शेतकरी विकासासाठी केलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेती आणि शेतकरी यांचा विकास हा समाजाच्या केंद्रस्थानी असला पाहिजे."

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख डॉ.हणमंत लोंढे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.सुखदेव शिंदे यांनी करुन दिला.या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.निंबराज तंटक, उपप्राचार्य डॉ.लतिका बागल, उपप्राचार्य चंद्रकांत रासकर,अधिष्ठाता डॉ तानाजी लोखंडे,रुसा समन्वयक डॉ.बजरंग शितोळे,आयक्यूएसी समन्वयक डॉ.अमर कांबळे, स्वायत्त महाविद्यालय समन्वयक डॉ. मधुकर जडल, कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव,सिनिअर महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख प्राध्यापक, संशोधक,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. 

   या कार्यक्रमास तांत्रिक साहाय्य प्रा.राजेंद्र मोरे व डॉ.उमेश साळुंखे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.भारती सुडके यांनी केले.उपस्थितांचे आभार डॉ.रविराज कांबळे यांनी मानले.
 
Top