अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने व ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावल्याने

       सोलापूर, दि.२९/१२/२०२० -जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र (अर्ज) दाखल करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरु आहे. काही ठिकाणी अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने व ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावल्याने ऑफलाईन पद्धतीने (पारंपरिक पद्धतीने) नामनिर्देशनपत्र (अर्ज) स्विकारण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहेत.

  इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये,त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून निवडणूक आयोगाने पारंपारिक पद्धतीने अर्ज स्विकारण्याचा तसेच नामनिर्देशनपत्र  दाखल करण्याची वेळ दि.३० डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

         जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून नामनिर्देशनपत्र,घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांनी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पारंपरिक पद्धतीने स्विकारलेले नामनिर्देशनपत्र संबंधित निवडणूक निर्णय हे छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकाच्या मदतीने,संगणक प्रणालीमध्ये भरुन घेणार आहेत.

जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज ऑनलाईनसह ऑफलाईन स्वीकारण्याचे आदेश  

      ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य भरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे नागरिकांची झुंबड उडालेली आहे. जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे ३० डिसेंबर रोजीही राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईनसह ऑफलाईन अर्ज स्वीकारावेत,असे निर्देश डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) प्रभारी उपायुक्त तथा प्रकल्प संचालक मेघराज भाते यांनी दिले आहेत.

       उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जाची पोहोच पावती मिळावी, गैरसोय होऊ नये याकरिता ३० डिसेंबर २०२० रोजीही अर्ज ऑन लाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ठिकठिकाणी समितीने अर्जाची संख्या लक्षात घेत अर्ज स्वीकारण्याची खिडकी/कक्ष वाढवावेत व कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करावे. या दिवशी आलेले सर्व अर्ज दाखल करेपर्यंत कार्यालय सुरू ठेवावीत . ऑफलाईन दाखल केलेल्या अर्जाची माहिती दि.०१ जानेवारी २०२१ पर्यंत ‘बार्टी’कडे लेखी स्वरूपात कळवावी, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

ग्रामपंचायती निवडणुकीसाठी ऑफलाईन अर्ज स्विकारणार - निवडणूक आयोगाचा निर्णय gram panchayat will accept offline applications for elections - election commission decision
 
Top