बिबट्याच्या प्रश्नात आ.संजयमामा शिंदे यांचे बारीक लक्ष ..
कुर्डुवाडी,(राहुल धोका)-बीड जिल्ह्यात हाहाकार माजविलेला बिबट्या सोलापूर जिल्ह्यात व करमाळा तालुक्यात दि.०३/१२/२०२० रोजी दाखल झाला .याच दिवशी या बिबट्याने लिंबेवाडी येथील कल्याण देविदास फुंदे या तरुणावर हल्ला केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आ.संजयमामा शिंदे यांनी ०४ डिसेंबर रोजी लिंबेवाडी येथे जाऊन फुंदे कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच तालुक्यातील इतर शेतकरी बांधव रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जाऊ नयेत म्हणून महावितरणशी चर्चा करून त्यांनी महावितरणचे वेळापत्रक बदलले व रात्रीची वीज बंद करून दिवसा वीज पुरवठा सुरू केला.

दि.०५ डिसेंबर रोजी अंजनडोह येथील जयश्री दयानंद शिंदे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.या दोन घटनांमुळे बिबट्याचे जिवंत राहणे हे तालुक्यातील नागरिकांसाठी धोकादायक आहे हे ओळखून आ.संजयमामा शिंदे यांनी सोलापूर जिल्हा वनपरिक्षेत्र अधिकारी धैर्यशील पाटील ,महाराष्ट्र राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक नितीन काकोडकर,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,वनमंत्री संजय राठोड ,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विशाल हिरे,पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे ,तहसीलदार समीर माने यांना तात्काळ फोन केले. वरिष्ठ पातळीवरती बिबट्याला मारण्याची परवानगी द्या अशी विनंती केली. तर स्थानिक पातळीवर रात्रभर सर्च ऑपरेशन करा बिबट्या निश्चित सापडेल अशा सूचना दिल्या.बिबट्याविषयी काही अडचण आली तर मला रात्री कधीही फोन करा असे त्यांनी सांगितले .

     दि.सहा डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यासह अहमदनगर व बीड जिल्ह्यातील वनविभागाचे जवळपास २०० कर्मचारी करमाळा तालुक्यात दाखल झाले.याच दिवशी म्हणजे सहा डिसेंबर रोजी आ.संजयमामा शिंदे यांनी तालुक्यातील तलाठी ,ग्रामसेवक, पोलीस पाटील, वनविभागाचे कर्मचारी - अधिकारी यांची संयुक्त बैठक पंचायत समिती सभागृहात घेतली. या बैठकीमध्ये नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांनी केले .अंजनडोह येथे जाऊन मयत शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन केले. याच रात्री आ. संजयमामा शिंदे यांच्या मागणीला यश आले आणि बिबट्या पिंजऱ्यामध्ये सापडत नसेल तसेच तो बेशुद्ध करण्यासही अडचणी येत असतील तर त्याला ठार मारावे असा आदेश मुख्य वन्यजीव रक्षक नितीन काकोडकर यांनी काढला.

दि.०७ डिसेंबर रोजी चिखलठाण येथील ऊसतोड कामगाराची आठ वर्षे वयाची मुलगी फुलाबाई हरिचंद्र कोठले ही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली.ही बातमी समजली तेव्हा आ.संजयमामा शिंदे हे कामानिमित्त सोलापूर येथे होते.तेथील नियोजित कामे सोडून ते तात्काळ चिखलठाण येथे आले.कसल्याही परिस्थितीत बिबट्या सापडला पाहिजे किंवा त्याला संपवलं तरी पाहिजे या उद्देशाने सर्व शासकीय यंत्रणांना त्यांनी सूचना केल्या. राजेंद्रकुमार बारकुंड या शेतकऱ्याचा पाच एकर ऊस पेटवून देण्यास त्यांनी संमती घेतली. परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणाहून बिबट्या पसार झाला.हे समजल्याबरोबर त्यांनी नागरिकांनी सावधानता बाळगावी बिबट्या पसार झाला आहे असे आवाहन तालुक्यातील व विशेषतः पश्चिम भागातील नागरिकांना केले. याच बिबट्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी म्हणून दि.०८ डिसेंबर रोजी ते मुंबईत दाखल झाले आहेत. फक्त एखाद्या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवून प्रश्न सुटणार नाही याची त्यांना कल्पना आहे ,त्यामुळे स्थानिक पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत सर्व शासकीय यंत्रणांच्या संपर्कात ते सातत्याने आहेत . करमाळा तालुक्यात जवळपास २०० कर्मचारी वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत. त्यांच्या निवासाची सोय करून देण्या पर्यंत आ.संजयमामा शिंदे यांचे बारीक लक्ष आहे .अधिकारी वर्गाची निवासाची सोय करण्यासाठी त्यांनी आपले विठ्ठल निवास, बायपास रोड ,करमाळा हे निवासस्थान उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली.म्हणजेच बिबट्याच्या या प्रश्नात आ.संजयमामा शिंदे हे बारीक लक्ष देऊन आहेत हे समजते.
 
Top