सर्वच मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करण्याचे मंदिर विश्‍वस्तांना आवाहन - हिंदु जनजागृती समिती

 ही नग्नतेशी संबंधित नसून ती धर्मशास्त्रांशी संबंधित

दि.०२/१२/२०२० - शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने नुकतेच भाविकांना भारतीय संस्कृती नुसार आणि सभ्यतापूर्ण वस्त्र परिधान करण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारे केवळ साई संस्थाननेच नव्हे, तर देशभरातील अनेक मंदिरां मध्ये तसेच गोव्यातील चर्चमध्ये वस्त्रसंहिता (ड्रेस-कोड) लागू करण्यात आलेली आहे. मंदिरांमध्ये लागू करण्यात आलेली वस्त्रसंहिता ही नग्नतेशी संबंधित नसून ती धर्मशास्त्रांशी संबंधित आहे. केवळ मंदिरच नव्हे, विविध क्षेत्रांमध्ये वस्त्रे कोणती घालावीत, याचे काही नियम ठरलेले आहेत. त्या ठिकाणी 'असेच वस्त्र का ?', असे कोणी विचारत नाही; मात्र हिंदु देवस्थानांनी असे आवाहन केले की, लगेच अन्याय झाल्याची अभ्यासहीन ओरड केली जाते. मंदिरात श्रद्धेने येणारे भक्त आणि धर्मपरंपरा यांचे पालन करणारे भाविक या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत याचे आनंदाने पालन आणि स्वागतच करतील, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक सुनील घनवट यांनी म्हटले आहे. तसेच साई संस्थानप्रमाणेच सर्वच मंदिरांत भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू करावी,असे आवाहनही सर्व मंदिर विश्‍वस्तांना श्री. घनवट यांनी केले आहे.

संस्थानने कोठेही तोकडे कपड्यांचा उल्लेख केला नाही

मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात,अशी अत्यंत अभ्यासहीन टीका करणारे तथाकथित पुरोगाम्यांनी संस्थानने काय आवाहन केले आहे, हे पण नीट वाचत नाहीत. संस्थानने कोठेही तोकडे कपड्यांचा उल्लेख केला नाही, पुरूष-महिला असा उल्लेख केला नाही, तरी अनेक दिवस प्रसिद्धी न मिळाल्याने केलेला हा 'पब्लिसिटी स्टंट' आहे. संस्थानने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. सोवळे-उपरणे घालणार्‍या पुजार्‍यांना अर्धनग्न म्हणणे, ही बौद्धिक दिवाळखोरीच नाही का ? असा प्रश्न सुनील घनवट ,राज्य संघटक,हिंदु जनजागृती समिती, यांनी उपस्थित केला.

     मंदिरातील वस्त्रसंहिता ही नग्नतेशी नव्हे,तर धर्मशास्त्राशी संबंधित  The dress code in the temple is not about nudity, but about theology - हिंदु जनजागृती समिती
 
Top