उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम

'माहिती आणि कार्यदिशा' पुस्तिकेचे प्रकाशन

  पंढरपूर,(प्रतिनिधी) - डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहाराचे महत्व वाढले असून,ग्राहकांनी सजगपणे व्यवहार पार पडावेत ,असे प्रतिपादन पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले. २४ डिसेंबर ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक पंचायत महाराष्ट्राचा मानदंड असणारी पुस्तिका 'माहिती आणि कार्यदिशा'चे प्रकाशन प्रसंगी बोलत होते.

   याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी आणलेल्या ग्राहक संरक्षण कायद्यामुळे व्यापारातील अरिष्ट रूढी परंपरांना आळा बसला असून,ग्राहकांना ९० दिवसात न्याय मिळणे सोपे झाले आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे ग्राहक कल्याण क्षेत्रातील राज्यव्यापी काम खूप मोठे असून त्यांनी ग्राहकांचे शोषणमुक्तीसाठी सातत्याने कार्यरत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

   प्रकाशनाच्या छोटेखानी कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश फडे यांनी केले.प्रास्ताविक पुणे विभागीय सचिव गुरुनाथ बहिरट आणि आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष दिनेश खंडेलवाल यांनी केले.

नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर

    यासह पंढरपूर शहरात असलेल्या ५ शासकीय कार्यालयात प्रकाशन सोहळा पार पडला.पंढरपूर नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या हस्ते 'माहिती आणि कार्यदिशा' या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र ग्राहक हक्कांचे संवर्धन करणारी अग्रणी संघटना आहे. पंढरपूर नगर परिषद ग्राहकांना नागरी सुविधा देण्यास सदैव तत्पर असल्याचे श्री.मानोरकर यांनी सांगितले. याप्रसंगी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर नगरसेविका शकुंतला नडगिरे उपस्थित होत्या.

    गटविकास अधिकारी रविकिरण घोडके

       पंचायत समिती पंढरपूर येथे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना घोडके यांनी सांगितले की, ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या सुधारणेमुळे ऑनलाईन जगतातील होणारी व्यापारी फसवणूक थांबेल.

       पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार

    पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना पो.नि.अरुण पवार म्हणाले की ग्राहक संरक्षण कायदा हा भारतातील एकमेव कायदा आहे जो कोणत्याही प्रकारची आंदोलने, तोडफोड, जाळपोळ न करता शांततेत लोकशाही मार्गाने अस्तित्वात आलेला कायदा आहे.

      आरटीओ कॅम्पमध्ये अधिकारी महेश रायबान

    याचबरोबर पंढरपूर येथे असलेल्या आरटीओ कॅम्पमध्ये प्रभारी अधिकारी महेश रायबान यांच्या हस्ते माहिती आणि कार्यदिशा या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना श्री. रायबान म्हणाले की, प्रवासी ग्राहकांसाठी ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाची स्थापना 1989 साली केल्याने, प्रवासी ग्राहकांच्या समस्या दूर होण्यास राज्यभर मदत झाली.

       या सर्व प्रकाशन सोहळ्यास ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे पांडुरंग बापट,मिलिंद वाईकर,सागर रणदिवे,विजय वरपे, दत्तात्रय ताठे,महादेव खंडागळे,नागेश आदापुरे,गणेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

    या कार्यक्रमासाठी चिंतामणी दामोदरे,अभिजीत आवताडे, श्रीनिवास खाबाणी,विजय सामंत, सुधाकर खरात यांनी प्रयत्न केले .

ग्राहकांनी सजग व्यवहार करावेत - उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम Consumers should be vigilant - Sub-Divisional Police Officer Vikram Kadam
 
Top