सामाजिक जाणीवेतून संवेदनशीलता जपत ऊसतोडणी कामगारांना दिवाळी साहित्य, सॅनिटायझर

  मंगळवेढा - युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याने दोनच दिवसापूर्वी ऊस उत्पादक यांना २०० रुपये प्रमाणे दिवाळी भेट दिली तर कामगारांना १६.६६% इतका बोनस देऊन ऊस उत्पादक व कामगारांची ही दिवाळी गोड केली. याच वेळी सामाजिक जाणीवेतून संवेदनशीलता जपत शेकडो कि.मी.दूर वरुन आलेल्या ऊस तोडणी कामगारांची ही दिवाळी गोड व्हावी, या हेतूने कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून ऊसतोडणी कामगार यांना ऊसाच्या फडात जाऊन दिवाळी साहित्याचे तसेच कोरोनासारख्या रोगापासून सुरक्षितता व्हावी म्हणून सॅनिटायझरचे वाटप ऋषीकेश उमेश परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.

    कारखान्याच्या प्रगतीमध्ये सर्वात तळातील भूमिका बजाविणारे ऊस तोडणी कामगार हे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या घरापासून,आपल्या नातलगांपासून शेकडो कि.मी. दूर येऊन पहाटेपासून कडाक्याच्या थंडीमध्येही ऊसाच्या फडामध्ये जाऊन ऊस तोडणीचे काम करीत असतात.असे ऊस तोड कामगार व त्यांचे कुटुंबीय दिवाळी सणापासून वंचित राहू नये या करीता युटोपियन शुगर्सच्यावतीने ऊस तोडणी कामगारांना ऊसाच्या फडामध्ये जाऊन दिवाळी सणाकरीता आवश्यक असणारे सुगंधी तेल,रवा, साखर,उटणे,मैदा,खाद्यतेल,मोती साबण,बेसन, अशा प्रकारचे साहित्य व सध्याच्या कोविड-१९ या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या वातावरणा मध्ये खबरदारीचा उपाय म्हणून युटोपियन शुगर्स ने उत्पादित केलेल्या को-गो हँड सॅनिटायझर व मास्कचे मोफत वाटप कारखान्या च्यावतीने ऋषीकेश परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

      यावेळी पंढरपूर पं.स.सभापती दिलीप घाडगे युटोपियन शुगर्सचे मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांचेसह ऊस तोडणी कामगार उपस्थित होते.
 
Top