सोलापूर,०५/११/२०२०- मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा,सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य या संघटनांच्यावतीने मराठा आरक्षण मागणीसाठी सात नोव्हेंबर २०२० रोजी पंढरपूर अकलूज बारामती आकुर्डी निगडी मावळ वाशी या मार्गाने मुंबई मंत्रालयापर्यंत पायी दिंडी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.पायी दिंडीत सहभागी होण्यासाठी मराठा समाजातील लोकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र यावे यासाठी वरील संघटनांनी आव्हान केले आहे.

covid-19 चे अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार व प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात 31 हजार 404 व्यक्ती पूर्ण बाधित आहेत. ९१६ ठिकाणीही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सध्या कार्यान्वित आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे आंदोलन कर्ते एकत्र जमल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो व त्यातून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य व जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. सदर आंदोलनास मोठ्या संख्येने कार्यकर्ते पंढरपूर येथे एकत्र येण्यासाठी राज्यातील इतर भागातून व सोलापूर जिल्ह्यातून एसटी बसने येऊन सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मोर्चामुळे पंढरपूर शहरात गर्दी होऊन सुरक्षित अंतर social distancing राखण्यात अडथळा निर्माण होणार आहे .पंढरपूर येथे येणाऱ्या बसेस मध्येसुद्धा कार्यकर्ते आंदोलनकर्ते गर्दी करून दाटीवाटीने येण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे सुरक्षित अंतर social distancing होणार नाही, त्यामुळे पंढरपूर शहरात कोरोनाचा प्रसार वाढून नागरिकांचे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे .

त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये मराठा समाजाचे आंदोलनकर्ते पंढरपूर येथे एसटीने शहरात येऊ नये आणि covid-19 प्रसार होण्यासारखे अनुचित प्रकार घडू नये व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी दि ०५ नोव्हेंबर २०२० रोजीचे रात्री बारापासून ते सात नोव्हेंबर २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बंद ठेवण्याचे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
 
Top