डॉ.शीतल आमटे करजगी यांच्या निधनानंतर तरी त्यांच्या कामांना,विचारांना त्यांच्या मृत्यूनंतर तरी न्याय मिळाला पाहिजे... ना.डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे,३०/११/२०२० - डॉ.शीतल आमटे करजगी यांचे आज अत्यंत धक्कादायक असे निधन झालेले आहे.त्यांचा माझा गेले काही महिने परिचय अधिक चांगल्या प्रकारे झाला होता. २५ नोव्हेंबर २०२० ला माझे आणि त्यांचे बोलणं झालं होते तेच आमचे शेवटचे बोलणे ठरले.त्यावेळेला कौटुंबिक प्रश्नाच्या बरोबर त्यांच्या मनात कोणते विषय येत होते,त्यांना कोणत्या अडचणी जाणवत होत्या, त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही बोललो होतो.

   शीतलच्या अशा अचानक धक्कादायक आणि ज्या प्रकारे निधन झालेले कळल्यावर मला स्वतःला फार मोठा धक्का बसलेला आहे.त्या अत्यंत सुविद्य, हुशार, कष्टाळू, कृतिशील समाज सुधारक आणि वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन असणाऱ्या होत्या.अनेक आकांक्षा असलेल्या त्या भावनाप्रधान सामाजिक कार्यकर्त्या होत्या.

      आमच्या एका व्हिडिओ कॉन्फरन्सला त्या महिलांच्या उद्योजकतेच्या विषयामध्ये सामाजिक संस्थांनी तयार केलेले उद्योग आणि त्याच्या मधली भूमिका या विषयावर त्या सहभागी देखील झाल्या होत्या व मनोगतही मांडले होते. शीतलच्या निधनाने एक अतिशय उमदे नेतृत्व आपण गमावलेले आहे. ज्या प्रकारे त्यांनी कुष्ठ रोग्याची सेवा केली, त्याचे विडिओसुद्धा त्यांनी मला बघण्यासाठी पाठवले होते. अत्यंत कष्ट घेऊन त्या सगळे ते काम दुरुस्त करण्याचे प्रयत्न करत होत्या.

     त्यांना सरकारच्याकडून राहिलेल्या प्रकल्पांबद्दल काही सहकार्य पाहिजे होती, त्याबद्दल सुद्धा मी त्यांना सांगितले होते,की तुम्ही मला तसे पत्र द्या जेणेकरून त्या त्या विभागा च्यातर्फे पाठपुरावा करायला मदत करते अशी मी ग्वाही दिली होती व शीतल यांनी आभार ही कळवले होते.

      ही सर्व कामे अपूर्ण सोडून त्या अचानक धक्कादायक पद्धतीने सोडून गेल्या आहेत.त्यांच्या मृत्यूमुळे झालेली हानी ही काही भरून येण्या सारखी नाही,कुष्ठरोगी व पिडीतांनी खरी साथीदार गमावली आहे.विशेष म्हणजे अत्यंत दुर्मिळ अश्या प्रकारचे हुशार,सेवाभावी असणारे नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व ज्या वेळेस समाज सेवेत स्वतःला वाहून घेते त्याच्यानंतर त्यांना काही वेगळ्या कारणामुळे किंवा त्यातल्या अनेक कारणामुळे जेव्हा निराशा येते तेव्हा आपण त्यांना कायमचे आपण गमावतो. हा एक समाजसेवी क्षेत्रांनी स्वतःच स्वतःकडे अंतर्मुख होऊन बघावे अशा प्रकारची निश्चित गरज आहे. शीतल आमटे करजगी यांच्या दुःखद निधनाबद्दल मी श्रद्धांजली व्यक्त करते. त्यांच्यावर प्रेम करणारा आणि ज्यांना त्या हव्या होत्या,ज्यांना त्यांचे महत्व होते ,त्यांच्या आणि जे त्यांचे बाकीचे जे सुह्रद ,परिवार होते यांच्या दुःखात मी सहभागी आहे.शीतल यांच्या विचारांना त्याच्या मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा असे मला निश्चित वाटते ,अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य विधानपरिषद,ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
 
Top