अटी व शर्तींच्या अधिन राहून पर्यटन स्थळे सुरु

सातारा,दि.०४/११/२०२०,(जिमाका) - सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 रुग्णांचे संक्रमण रोखण्याच्या अनुषंगाने पर्यटन स्थळे इत्यादी ठिकाणी भेटी देण्यासाठी मनाई करण्यात आली होती.अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा प्र.जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी साथरोग अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अनव्ये व शासन निर्णयान्वये प्राप्त अधिकारान्वये सातारा जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र वगळून उर्वरित बाहेरील क्षेत्रातील “पर्यटन स्थळे” मार्गदर्शक सूचना आणि अटी व शर्तींच्या अधिन राहून खुली करण्यास परवानगी दिली आहे.

*मार्गदर्शक सूचना:*

   पर्यटन स्थळांना भेटी देणा-या पर्यटकांना सामाजिक अंतर राखणेबाबत संबधीत विभागा मार्फत सूचित करण्यात यावे व रांग पद्धतीचा (Queue System) अवलंब करण्यात यावा. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखणेसाठी १ मीटर अंतरावर खुणा करून घेणे. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटन स्थळे ज्या विभागाच्या अखत्यारीत येते त्या विभागाने पर्यटन स्थळांवर गर्दी होणार नाही, यासाठीचे काटेकोरपणे नियोजन करावे. त्या करिता स्वतंत्ररित्या एन्ट्री व एक्झिट पॉईंट स्थापन करावेत. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी येणा-या पर्यटकांचे प्रवेशद्वाराजवळ सामाजिक अंतर राखून तपासणी करण्यात यावी. यामध्ये पर्यटकांचे तापमान, ऑक्सिजन पातळी इ.तपासणी करण्यात यावी. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी येणा-या पर्यटकांचे नाव, पत्ता, वय, Co-morbidity, तापमान, SpO2 व मागील १४ दिवसांच्या प्रवासाची माहितीची नोंद रजिस्टर मध्ये करण्यात यावी. ज्या पर्यटकांचे तापमान 38.0°C किंवा 100.4°F पेक्षा जास्त आहे व ऑक्सिजन पातळी 95 पेक्षा कमी असेल अशा पर्यटकांना पर्यटन स्थळांवर जाणेपासून प्रतिबंध करण्यात यावे. तापमान जास्त अथवा ऑक्सिजन पातळी कमी असल्यास संबंधित व्यक्तीस रूग्णालयामध्ये संदर्भित करावे. ज्या पर्यटकांना कोविड 19 सदृश्य लक्षणे उदा.सर्दी, खोकला, ताप इ. लक्षणे असल्यास पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात यावे व दवाखान्यामध्ये संदर्भित करावे. पर्यटनस्थळाच्या ठिकाणावरील सर्व कर्मचारी यांनी मास्क, ग्लोब्ज, फेस शिल्ड, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक असेल. गाईड यांनी मास्क,फेस शिल्ड, ग्लोव्ज,सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे. पर्यटकांनी मास्क,फेस शिल्ड,ग्लोब्ज,सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे. पर्यटन स्थळाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी ते ठिकाण ज्या विभागाच्या अखत्यारीत येते त्या विभागाने घेण्यात यावी. सहली अथवा मोठ्या समूहांना (ग्रुप) पर्यटन स्थळाच्या ठिकाणी भेट देण्यास मनाई आहे. पर्यटन स्थळावर ज्या-ज्या ठिकाणी नागरिकांचा स्पर्श होण्याची शक्यता आहे अशी सर्व ठिकाणे वारंवार निर्जंतुक करणे बंधनकारक आहे.वेळोवेळी शासनामार्फत निर्गमित झालेल्या आणि प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील.

      सदर आदेशातील अटी व शर्तीचे उल्लंघन केलेस संबंधिताविरुध्द साथरोग नियंत्रण कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार व अन्य कायदेशिर तरतूदीनुसार कार्यवाहीस पात्र राहील.
 
Top