विद्यार्थ्यांना मास्कची माहिती देताना गटविकास अधिकारी रविकीरण घोडके

शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकाकडून पाचशे मास्क - सलीम पठाण यांचा सामाजिक उपक्रम
       शेळवे,(संभाजी वाघुले),२३/११/२०२० - कोरोनाच्या संकटातील कितीही कठीण कालावधी असला तरी आपले सामाजिक कर्तव्य जोपासण्या साठी अनेकजण पुढे येत आहेत. याच जाणीवेतून पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथील पालक सलीम पठाण यांनी रोपळे येथील श्री. शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसाठी पाचशे मास्क भेट दिले.

      एकीकडे कोरोना महामारीचा संसर्ग वाढत चालला असतानाच शासनाच्या नियमांचे पालन करीत शाळा सुरू करण्याचे आव्हान येथील शिक्षकांसमोर आहे तर सुरक्षिततेसाठी लागणारी साधनसामुग्री उभा करणे, मुख्य म्हणजे संसर्ग वाढुच नये या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना शिस्त लावणे हे सर्वात मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे. या सर्व परिस्थितीच्या तणावामध्ये शाळेचे कामकाज सुरू असतानाच पालक सलीम पठाण यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाचशे मास्क भेट देण्याचा सामाजिक उपक्रम राबविल्याने शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी एकप्रकारचे सुरक्षाकवच निर्माण झाले आहे तर या सामाजिक उपक्रमा बाबत सलीम पठाण यांचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मास्क
सध्या कोरोनाच्या दृष्टीकोनातून शाळा सुरू करणे आव्हानात्मक झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी सुरक्षीत रहावे म्हणून सुमारे बाराशे मास्क दिले. माझी शाळा ...मी शाळेचा याप्रमाणे शाळेसाठी सतत प्रयत्नशील राहून सामाजिक कर्तव्य जोपासण्याचा यापुढे प्रयत्न करणार आहे.
सलीम पठाण, पालक
     सर्वप्रथम शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून आज शाळेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची डॉ विजयकुमार सरडे,डॉ.अनुजा शेडगे यांनी थर्मल व आँक्सीमिटरव्दारे टेस्ट करून विद्यार्थ्यांना वर्गामध्ये सोडण्यात आले.

    यावेळी बीडीओ रविकिरण घोडके,केंद्रप्रमुख भोसले यांनी सूचना देवून आरोग्याची माहिती दिली. तर आशा सेविका यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक पाटील बी.यु.,पर्यवेक्षक सी.एस. पाटील, शिक्षक व कर्मचारी यांचेसह पन्नास टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
 
Top