आकाश कंदिलाकडे बघण्यापेक्षा चंद्रभागेच्या वाळवंटात पडलेल्या खड्ड्यांकडे बघा...

  पंढरपूर,(प्रतिनिधी):- दिवाळीच्या सणात नुसतं आकाश कंदिलाकडं बघत बसू नका... अवैधरित्या होणार्‍या वाळु चोरीमुळे चंद्रभागेच्या वाळवंटात सर्वत्र खड्डेचखड्डे पडले असून साधुसंतांच्या समाध्यांना यामुळे धोका निर्माण झालाय.आत्ता तरी वाळु चोरट्यांवर कडक कारवाई करा आणि वाळु चोरी थांबवा नाहीतर आम्हाला कुठे, कधी, कशा पध्दतीने वाळुची चोरी होते आणि यात कोणकोण सामील आहे ? याची माहिती उघड करावी लागेल आणि वाळु चोरीस कारणीभुत ठरलेल्या सर्वांना कामाला लावावं लागेल! असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला आहे .

   आज दि.१४ नोव्हेंबर २०२० रोजी महर्षी वाल्मिकी संघाचे अनेक कार्यकर्ते चंद्रभागेच्या वाळवंटात गेले व येथे वाळु चोरीमुळे पडलेल्या खड्ड्यात आकाश कंदिल उभारुन अवैधरित्या होणार्‍या वाळु उपशाच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘‘बंद करा बंद करा ,वाळु चोरी बंद करा!’’ अशा घोषणा दिल्या. यावेळी गणेश अंकुशराव बोलत होते.

   पुढे बोलताना गणेश अंकुशराव म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षापासुन चंद्रभागेच्या पात्रात ठिकठिकाणी अवैधरित्या वाळुची चोरी मोठ्या प्रमाणात होतेय, या वाळु चोरीमुळे साधु-संतांची समाधी मंदिरे धोक्यात आलेली आहेत. वाळु चोरट्यांनी चंद्रभागेचे पात्र अक्षरश: ओरबाडून काढले आहे.नदीपात्रात पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी गेलेल्या कित्येक भाविकांचा अशा खड्ड्यात बुडून मृत्यू झाला आहे. आम्ही याविरोधात वारंवार आंदोलन करुन याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासन मात्र जाणुनबुजून याकडे कानाडोळा करत आहे.आजपर्यंत प्रशासना कडून कारवाई होईल आणि ही वाळु चोरी थांबेल या आशेवर आम्ही गप्प होतो परंतु यापुढे मात्र आम्ही गप्प बसणार नाही. लवकरात लवकर जर यावर उपाययोजना केली नाही तर आम्ही जे यापुढे जे आंदोलन करु त्या आंदोलनामुळे होणार्‍या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

    यावेळी होडी चालक-मालक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष सतीश नेहतराव, शिवसेना शहर प्रमुख रवी मुळे,बाबा अभंगराव,सुरज नेहतराव, अप्पा करकमकर, नंदु अभंगराव, अमर परचंडे, रामभाऊ सुरवसे, गोविंदा करकमकर, वैभव माने, मारुती करकमकर,विनय वनारे,तात्या अधटराव, सचिन अभंगराव,खंडू करकमकर,सोमा कांबळे, महेश कांबळे, शिवाजी परचंडे,बबडू नेहतराव, लंकेश बुराडे, ओंकार संगीतराव, अक्षय म्हेत्रे, बापु कांबळे, सिधू नेहतराव, ओंकार परचंडे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.  
 
Top