नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा

   पंढरपूर ,०७/११/२०२०- पंढरपूरच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर तसेच सर्व सदस्य,पदाधिकारी व आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी हिवताप योजना, नगर परिषद पंढरपूर या कार्यालयामार्फत पंढरपूर शहरात किटकजन्य रोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी तसेच कोरोना प्रतिबंधासाठी दैनंदिन डास आळी नाशक फवारणी, जंतूनाशक फवारणी, पाठीवरील पंप तसेच ब्लोअर मशीनद्वारे फवारणी करण्यात येत आहे .कंटेनर सर्वेक्षण,धूर फवारणी, डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे कोरोना प्रतिबंधा साठी फवारणी व आरोग्य शिक्षण आदी कार्यवाही करण्यात येत आहे.

     मार्च महिन्यापासून शहरात दैनंदिन स्तरावर कोरोना प्रतिबंधासाठी सार्वजनिक ठिकाणी,बँका, पोस्ट ऑफिस,रेल्वे स्टेशन, s.t. बस स्थानक इत्यादी ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे.


    पंढरपूर शहरात मागील महिन्यात आलेला पूर, अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साठून डासोत्पत्ती स्थाने निर्माण झाल्याने सर्वच परिसरात डास अळीनाशक व जंतुनाशक फवारणी करण्यात आली. कंटेनर सर्वेक्षणामध्ये एकूण अकरा हजार ४७३ घरांची तपासणी केली असता ८९५ दूषित ठिकाणे आढळलेली आहेत. डास नियंत्रणासाठी पंढरपूर शहरातील एकूण २७ हजार २०७ घरांमध्ये व परिसरात धूर फवारणी करण्यात आली.

किटकजन्य आजारासाठी सध्या पारेषण काळ सुरू असल्याने शहरातील सर्व नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. आपल्या घर व परिसरात सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे व आपला परिसर स्वच्छ ठेवावा. घरांमधील फ्रीज,कूलर,फुलदाण्या, कुंड्या इत्यादीमध्ये पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. घराबहुतालचे भंगार सामान, निरुपयोगी टायर ,नारळाच्या करवंट्या,चहाचे कप इत्यादी सामानाची त्वरित विल्हेवाट लावावी असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

शासनाचे मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे - नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले

       जून ते डिसेंबरअखेर पारेषण काळ सुरू असल्याने नागरिकांनी किटकजन्य आजार व साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी शासनाचे मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , उपमुख्याधिकारी सुुनील वाळुजकर,आरोग्य अधिकारी शरद वाघमारे तसेच हिवताप विभागाचे अधिकारी किरण मंजुळ यांनी नागरिकांना केले आहे.तसेच covid-19 प्रतिबंधासाठी सॅनिटायझर ,मास्क व सोशल डिस्टनसिंगचा वापर करावा.हात वारंवार साबणाने धुवावेत तसेच गर्दीत जाण्याचे टाळावे असे आवाहन आरोग्य विभाग व नागरिक योजना पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर यांचेकडून करण्यात आले आहे.
ज्या नागरिकांना गप्पी मासे हवे आहेत त्या नागरिकांनी हिवताप नागरी योजनेच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन किरण मंजुळ यांनी केले आहे.
 
Top