बापाचा आक्रोश
मुलाच्या मृत्युस जबाबदार आरोपीला अटक करा
पंढरपूर (वार्ताहर) दि.१९/११/२०२० - माझा चार वर्षाचा चिमुरडा, डोक्यामध्ये दगड लागून मयत झाला.त्याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या आरोपीस ताबडतोब अटक करावी असा अर्ज मयत श्लोक घन यांचे वडील रविंद्र घन यांनी पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना दिला आहे.

पंढरपूरातील तांबेकर गल्लीमध्ये सोमनाथ होरणे यांच्या जुन्या घरजागेचे पाडकाम सुरू होते. हे पाडकाम करत असताना रस्त्यावरील रहदारीस पाडकामाची सुचना देण्यासाठी कोणीही नव्हते. ठेकेदाराचे मजूर भिंतीच्या आतमध्ये पाडकाम करत होते.दि ०५ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता या पाडकामाचा एक मोठा दगड रस्त्यावरून जात असलेल्या चार वर्षाच्या चिमुरड्या श्लोकच्या अंगावर पडला. यात श्लोकचा  जागेेवरच मृत्यू झाला.या अपघातात श्लोकचा एक हातही तुटून बाजूला पडला होता.या अपघातास जबाबदार असणारा जागा मालक सोमनाथ होरणे अजुनही पंढरपूर शहर पोलीसांना सापडत नाही. सोमनाथ होरणे पंढरपूरातील प्रतिष्ठीत व्यापारी असून एका मोठ्या बँकेचा संचालक आहे. यामुळेच कदाचित शहर पोलीसांना तो सापडत नसावा.तरी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी व्यक्तीश: या केसमध्ये लक्ष घालून आरोपीस त्वरीत अटक करावी, असेही या अर्जात रविंद्र घन यांनी म्हटले आहे.
 
Top