यावेळी राज्य शासनाने मंदिर भाविकांना खुले करून देण्याबाबत परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मंत्री महोदयांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला.राज्य शासनाकडून मंदिर भाविकांसाठी खुले करण्याबाबत आदेशित केलेल्या कार्यपद्धतीनुसार व मार्गदर्शक सूचना अनुसरुन कार्यवाही करण्याचे ठरले आहे. त्यामध्ये श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेचे फक्त मुखदर्शन देण्याच्या दृष्टीने भाविकांना ऑनलाईन दर्शन प्रणालीचा वापर करण्याचे ठरले. त्यानुसार भाविकांना मंदिर समितीच्या www. vithalrukminimandir.org या संकेत स्थळावरून बुकींग करणे अनिवार्य राहील . त्यासाठी दैनंदिन जास्तीत जास्त एक हजार भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येईल. सुमारे दहा तासात प्रतितास शंभर व्हावे यानुसार प्रतिदिनी एक हजार भाविकांच्या मुखदर्शनाची व्यवस्था कोविड संदर्भातील सर्व उपाययोजनांचा अवलंब करून करण्यात आले आहे. या भाविकांच्या संख्येमध्ये मंदिर समिती वेळोवेळी निर्णय घेऊन वाढ करण्याचा निर्णय घेईल. सदरचे ऑनलाईन बुकींग अगोदर किमान २४ तास व जास्तीत जास्त पुढील आठ दिवसांपर्यंत बुकिंग करता येईल. तथापि दिनांक १६/११/२०२० रोजीचे दर्शन बुकिंग आज सायंकाळी ७.०० पासून सुरू राहील. मुखदर्शनासाठी कासार घाट येथे दर्शन पास तपासणी करून स्काय वाँँक वापरून २४० मीटर ते दर्शन मंडप पूर्व गेट येथे स्कॅनद्वारे बॅग साहित्य तपासणी ,मोबाईल लॉकरमध्ये मोबाईल ठेवणे, थर्मल स्कँँनिंग करणे ऑक्सीजन पातळी तपासणी, मास्क परिधान केले आहे किंवा कसे याची तपासणी करणे , सर्दी खोकला ताप किंवा इतर कोरोनाची लक्षणे दिसल्यास तिथून भाविकांना बाहेर काढणे , या मार्गाने विठ्ठलाचे मुखदर्शन घेऊन लक्ष चौर्याऐंशी शेजारील दरवाज्यातून श्रीरुक्मिणी सभामंडप येथे दर्शन घेऊन व्हीआयपी गेेट येथून भाविक बाहेर जातील.
या दर्शन रांगेत सामाजिक अंतर ठेवण्यासाठी जागोजागी मार्किंग करण्यात आलेली आहे. तसेच सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, सार्वजनिक सूचना प्रसारण प्रमाण इत्यादी व्यवस्था मंदिर समितीकडून करण्यात येत आहे. अन्नछत्र व प्रसाद व्यवस्था बंद राहील. या ऑनलाईन बुकींग द्वारे फक्त मुखदर्शन सुविधा प्राप्त होणार आहे याची भाविकांनी नोंद घ्यावी. ऑनलाइन दर्शन बुकिंग करून येणाऱ्या भाविकांनी कोविड बाबतच्या नियमांचे पालन करावे,मास्क परिधान करणे,दर्शन रांगेत सामाजिक अंतर ठेवणे , दोन भाविकांमध्ये सहा फूट अंतर, हाताला सॅनिटायझर लावणे बंधनकारक राहील तसेच ६५ वर्षांपूर्वी व्यक्ती दहा वर्षाखालील मुले, गर्भवती महिला तसेच आजारी व्यक्ती यांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता भाविकांनी मंदिर समिती सहकार्य करावे असे आवाहन मंदिर समितीमार्फत करण्यात आले आहे