संशोधन ही समाजाची महत्वाची गरज

पंढरपूर,०५/११/२०२० – “कोणत्याही क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनाला खूप महत्व असून त्याचे स्वामित्त्व हक्क प्राप्त करता येतात.त्यासाठी शिक्षण, भाषा, वय, लिंग, प्रदेश अशी कोणत्याही स्वरूपाची अट असत नाही.विद्यार्थी आणि शिक्षकांनी समाज जीवनातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन नवनवीन शोध लावावेत.अशा स्वरूपाचे शोध समाजाच्या समोर येण्यापूर्वी त्याचे कायदेशीर हक्क प्राप्त करावेत.तरच त्या संशोधनातून चांगल्या प्रकारचा नफा कमविता येतो. संशोधन ही समाजाची महत्वाची गरज असून सर्वच क्षेत्रात मोठा वाव आहे.” असे प्रतिपादन मुंबई येथील पेटंट ऑफिसमधील सहाय्यक संचालक डॉ.अजय ठाकूर यांनी केले.

   रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परामर्श योजनेअंतर्गत ‘बौद्धिक संपत्ती अधिकार’ या विषयावर एकदिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे हे होते. 

अन्यथा त्यापासून आपणास लाभ मिळविता येत नाही

 डॉ.अजय ठाकूर पुढे म्हणाले की,“आय.पी.आर., ट्रेडमार्क,भौगोलिक मानांकन,इंडस्ट्रीयल डिझाईन या अलीकडील काळातील अत्यंत महत्व प्राप्त झालेल्या बाबी असून बौद्धिक स्तरावर निर्माण केलेली प्रत्येक बाब आपणास बौद्धिक संपत्ती म्हणून अग्रहीत करता येते. नाविन्यपूर्ण संशोधनाचे कायदेशीर हक्क प्राप्त केल्याशिवाय असे संशोधन संशोधकांनी समाजासमोर आणू नये. अन्यथा त्यापासून आपणास लाभ मिळविता येत नाही.”
 समाजातील नित्याच्या गरजा लक्षात घेवून संशोधन करावे
  अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे म्हणाले की,“महाविद्यालयातून विद्यार्थी व शिक्षकांनी समाजातील नित्याच्या गरजा लक्षात घेवून संशोधन करावे. या संशोधनात स्थानिक गरजा लक्षात घ्याव्यात. महाविद्यालयीन स्थरावर समस्यांशी निगडीत संशोधनाला प्राधान्य देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग विविध प्रोत्साहन पर योजना राबवीत असते. अशा संशोधनाचा शिक्षकांनी अधिकाधिक लाभ घेतला पाहिजे. समाजाला चांगल्या शोधा बरोबरच चांगले संशोधकही हवे आहेत.त्यांची निर्मिती महाविद्यालयातून व्हावी.”

 या वेबिनारचे उद्घाटन पुणे येथील डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.जे.पवार यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतगर्त गुणवत्ता सुधार समितीचे समन्वयक डॉ.अमर कांबळे यांनी केले. प्रमुख मान्यवरांचा परिचय डॉ.चंद्रकांत काळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनंजय वाघदरे यांनी केले. 

   या वेबिनारसाठी माणदेश महाविद्यालय,जुनोनी, मदनसिंह मोहिते पाटील विज्ञान महाविद्यालय मंगळवेढा,न्यू सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए. कोर्टी, विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभूर्णी व कला व वाणिज्य महाविद्यालय माढा या परामर्श अंतर्गत समाविष्ट असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.निंबराज तंटक, उपप्राचार्य डॉ.लतिका बागल,उपप्राचार्य चंद्रकांत रासकर,अधिष्ठाता प्रोफेसर डॉ.तानाजी लोखंडे, रुसा समन्वयक डॉ.बजरंग शितोळे,स्वायत्त समन्वयक डॉ.मधुकर जडल, कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल डॉ. विनया पाटील,प्रा.घनश्याम भगत,डॉ.श्रीकृष्ण कऱ्हाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.उपस्थितांचे आभार डॉ.समाधान माने यांनी मानले.
 
Top