तालुक्यातील २० मतदान केंद्रावर होणार मतदान

पंढरपूर, दि.१३/११/२०२०- पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंढरपूर तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या  graduate and teachers constituency election निवडणुकीसाठी तालुक्यातील ८ हजार १५१ मतदार असून,मतदानासाठी २० मतदान केंद्रावर सोय करण्यात आली असल्याची माहिती पंढरपूर प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी तालुक्यात पदवीधर मतदार संघासाठी ५ हजार १२२ पुरुष व १ हजार ३३८ स्त्री असे एकूण ६ हजार ४६० मतदार आहेत. तर शिक्षक मतदार संघासाठी १ हजार ३८८ पुरुष व ३०३ स्त्री मतदार असून असे एकूण १ हजार ६९१ मतदार आहेत.पदवीधर मतदारसंघासाठी १२ मतदान केंद्रे तर शिक्षक मतदारसंघासाठी ८ मतदान केंद्रावर मतदानाची सोय करण्यात आली आहे.

पदवीधर मतदारसंघासाठी द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर - ५ , कासेगांव- १ , करकंब- २, भाळवणी-१, पुळुज- १, तुंगत-१ तर पटवर्धन कुरोली-१ येथील १२ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.शिक्षक मतदारसंघासाठी द.ह. कवठेकर प्रशाला पंढरपूर - २, कासेगांव-१, करकंब-१, भाळवणी-१, पुळुज-१, तुंगत-१ तर पटवर्धन कुरोली-१ येथील ८ मतदान केंद्रावर मतदान होणार असल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकी साठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, निवडणुकीसाठी २९९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी २९ मतदान केंद्राध्यक्ष, ५६ सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष, १२० मतदान अधिकारी तर ९४ शिपाई कर्मचारी यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. दाखल केलेले उमेदवारी अर्ज दिनांक १७ नोव्हेबरपर्यंत काढून घेता येणार आहेत. मतदान दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत होणार आहे. मतमोजणी दि ३ डिसेंबर रोजी होणार आहे. कोविड-19 आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ७०० पेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या केंद्रासाठी सहाय्यकारी मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.यामध्ये पदवीधरां सांठी करकंब तर शिक्षकासांठी द.ह.कवठेकर प्रशाला येथे प्रत्येकी १ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोविड-19 च्या आजारबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करुन आपली जबाबदारी पार पाडावी अशा सूचनांही श्री.ढोले यांनी दिल्या.
 
Top