राजकीय पक्षांनी नवमतदार नोंदणी,दुरूस्तीसाठी सहभाग घ्यावा-जिल्हाधिकारी शंभरकर

 शेळवे (संभाजी वाघुले): भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून राजकीय पक्षांनी नवमतदार नोंदणी, मतदारांच्या मतदान कार्डातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनासोबत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख उपस्थित होते. 

   श्री.शंभरकर म्हणाले,१ जानेवारी २०२१ ला १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक मतदारांची नावनोंदणी केली जाते. लोकशाही मजबुतीसाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण गरजेचे आहे. मतदारांचे निधन झाले, मतदान कार्डावरील चुकीचा फोटो, नाव, जन्मतारीख, पत्त्यामध्ये बदल याविषयीच्या माहितीचे अद्ययावतीकरण करणे गरजेचे आहे. या साठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या मदतीला राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (बूथ लेव्हल एजन्ट- बीएलए)  नेमणूक करावी. यामुळे मतदार यादी अद्ययावत करणे सोयीचे जाणार आहे. मतदार याद्या प्रसिद्ध केल्या त्या तपासून दुरूस्त करून घ्याव्यात. 

 १५ डिसेंबर २०२० ते ५ जानेवारी २०२१ पर्यंत मतदारांच्या अर्जावर निर्णय घेण्यात येणार आहे. प्रारूप यादी १५ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राजकीय पक्षांनी मतदार याद्या दुरूस्त करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच १६ नोव्हेंबर २०२० ते १५ डिसेंबर २०२० अखेर मतदान केंद्रावर मतदान नोंदणीचा कार्यक्रम, दुरूस्त्या करण्यात येणार आहे. यादरम्यान शनिवार आणि रविवार चार विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत. मतदान नोंदणी आणि दुरूस्त्यांची ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे. मात्र ज्यांना ऑनलाईन शक्य नाही, त्यांच्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. महाविद्यालये सुरू झाल्यानंतर मोहीम राबवून नोंदणी केली जाणार आहे, सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करून मतदारांची नोंदणी करून घ्यावी, असे श्री. वाघमारे यांनी सांगितले. 

 यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदारांचा पत्ता बदल, मतदान केंद्र बदल यावर लक्ष ठेवण्याची सूचना केली.तसेच बीएलओ आणि बीएलए यांची नावे आणि फोन नंबर मतदान केंद्राच्या फलकावर लावावीत, असेही सूचित केले. 

  यावेळी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे अंबादास तडकापसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रा.डॉ. राज साळुंखे,बहुजन समाज पार्टीचे अर्जुन जाधव, शिवसेनेचे विजय पुकाळे, निरंजन बोद्धूल भारतीय जनता पार्टीचे सुकुमार सिद्धम,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ॲड.मनीष गडदे उपस्थित होते.
 
Top