मुंबई,२२/११/२०२०- कोरोनापासून राज्यातील जनतेचा बचाव करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यापुढेही करीत राहू. पण जनतेने काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. गर्दी टाळावी. पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे नसेल तर वेळीच सावध व्हा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना राज्यातील जनतेला केले.

  राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे.आतापर्यंत जनतेकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त करताना गेल्या आठ महिन्यांत अनेक सण येऊन गेले. आपण ते अतिशय साधेपणाने साजरे केले.गर्दी टाळली. त्यामुळेच कोरोना रुग्णांचा आकडाही कमी झाला. जनतेकडून मिळालेल्या या सहकार्याबद्दल मी आभारी आहे.अनेक जण मास्क न घालताच सध्या वावरत आहेत,पण कोरोना अद्याप गेलेला नाही हे लक्षात ठेवा.त्यामुळे अशी ढिलाई आपल्याला परवडणारी नाही,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

    संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी संघर्ष केला नसता तर मुंबई आपल्याला मिळाली नसती

   संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी संघर्ष केला नसता तर मुंबई आपल्याला मिळाली नसती.मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण होतील.पोलीस आणि कमांडोंनी जिवाची बाजी लावून दहशतवाद्यांना ठेचून काढले.असा लढा आपण देतो तेव्हा नक्कीच यश मिळते. याचा उल्लेख करत आपल्याला इतिहासाची पुनरावृत्ती कोरोनाच्या लढाईत करायची आहे,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

        प्रत्येक गोष्टीसाठी कायद्याची गरज नाही

 प्रत्येक सण साधेपणाने साजरा केलात.दिवाळीत फटाके वाजवू नका, असे मी सांगितले. तुम्ही ऐकले आणि यंदा खूप कमी फटाके उडाले.आता काही जण सांगतात रात्रीची संचारबंदी लागू करा, मात्र प्रत्येक गोष्टीसाठी कायद्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे खुली केली. पण या प्रार्थनास्थळांमध्ये गर्दी करू नका.कार्तिकी एकादशीही गर्दी न करता भक्तिभावाने साजरी करा,असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.

राज्याच्या आरोग्याचा रोडमॅप तयार

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अफाट काम केले. घरोघरी जाऊन माहिती घेण्यात आली. त्यामुळे राज्याच्या आरोग्याचा रोडमॅप तयार झाला. दर १०-१५ दिवसांनी जाऊन जनतेची विचारपूस करा, असे मी आरोग्य यंत्रणेला सांगितले आहे. कारण ओलावा नसेल, जिव्हाळा नसेल तर ‘कुटुंब’ या संस्थेला, शब्दाला काहीच अर्थ राहणार नाही. दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आली आहे. अहमदाबाद रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. अनेक पाश्चिमात्य देशांत तर लाट नव्हे, त्सुनामीच आली असावी, असे चित्र आहे. तशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण होऊ नये यासाठी कोरोनाचे संकट गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

तर मग आपल्याला कोरोनापासून कोणीही वाचवू शकणार नाही

   गेल्या आठ महिन्यांपासून डॉक्टर,आरोग्य कर्मचारी,पोलीस, महसूल कर्मचारी आपल्यासाठी झटत आहेत.अनेक डॉक्टर्स आणि पोलिसांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. आता जर कोरोनाची लाट आली आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी पडली तर मग आपल्याला कोरोनापासून कोणीही वाचवू शकणार नाही, म्हणूनच मास्क लावणे, हात धुणे आणि एकमेकांपासून अंतर पाळणे ही त्रिसूत्री आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
 
Top