भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी यांचा कार्यकाळ धाडसी,प्रेरणादायी व लोकांच्यावर प्रचंड प्रभाव असणार होता
पुणे,(डॉ अंकिता शहा )१९/११/२०२०-भारतरत्न इंदिरा गांधी यांचा काळ हा जागतिक स्तरावर व देशाअंतर्गत खूप आव्हानात्मक होता. या कालावधीत राजकीय व आर्थिक विविध मतप्रवाह होते. त्यामुळे राजकीय समीकरणे सुद्धा वेगवेगळी होत होती. त्यांचा कार्यकाळ हा धाडसी,प्रेरणादायी व लोकांच्यावर प्रचंड प्रभाव असणार होता.

मा.बाळासाहेब ठाकरे यांनी ३१ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिराजींच्या हत्येनंतर काढलेले चित्र खूप बोलके होते.राष्ट्रपती प्रतिभाताई व प्रणवकुमार मुखर्जी या दोन्ही काँग्रेसच्या राष्ट्रपतींना हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेने तर्फे पाठिंबा दिला, त्यामागे चांगली माणसे मोठी व्हावी असा हेतु होता.भारतरत्न इंदिरा गांधी यांनी संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्यासाठी १९५९ झाली काँग्रेस कार्यकारणीमध्ये केलेला ठराव, तसेच बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि जमिनीच्या सुधारणा कायदे यामुळे जनतेला दिलासा मिळाला.संयुक्त महाराष्ट्रात ५९ वर्षानंतर विधान भवनमध्ये उपसभापती म्हणून महिलेला काम करायला मिळणे हा महाराष्ट्रातील समाज सुधारक तसेच भारतीय समाजाचा प्रागतिक विचारांचा विजय म्हणावा लागेल.

इंदिरा गांधी यांचे नेतृत्वाखाली भारताने खूप प्रगती केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची राजनैतिक प्रतिमा उंचावली असे ,डॉ नीलम गोऱ्हे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.

राजीव गांधी स्मारक समिती,पुणे यांनी १९ नोव्हेंबरला भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्याचे अनुषंगाने ऑनलाईन कार्यक्रम घेतला होता.त्या कार्यक्रमां मध्ये इतिहासाचे अभ्यासक व प्रसिद्ध वकील राज कुलकर्णी,वरिष्ठ पत्रकार व राज्य सभेचे खासदार कुमार केतकर, जेष्ठ विचारवंत डॉ भालचंद्र मुणगेकर व संयोजक व राजीव गांधी स्मारक समिती पुणे अध्यक्ष गोपाळ तिवारी हे ऑन लाईन हजर होते.

वरिष्ठ पत्रकार व राज्य सभेचे खासदार कुमार केतकर यांनी आपल्या भाषणामध्ये इंदिरा गांधींच्या कारकिर्दीचा सविस्तर  आढावा घेतला त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर इंदिरा गांधींना पंतप्रधान होण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक लढवावी लागली.पक्षांतर्गत निवडणुकीनंतरच त्या पंतप्रधान झाल्या याचा आवर्जून उल्लेख केला. त्या कर्तव्य कठोर व तितक्याच हळव्या होत्या असे सांगितले.

     कार्यक्रमाची सुरुवात करताना राज कुलकर्णी यांनी इंदिरा गांधींच्या विचारावर पंडित जवाहरलाल नेहरूच्या विचाराचा पगडा होता या बाबत पंडित नेहरू व इंदिरा गांधी यांच्यामधील अनेक पत्रांचा उल्लेख केला.त्यांना फ्रेंच,जर्मन इटालियन आंतरराष्ट्रीय भाषा शिकण्यासंदर्भात पंडित नेहरूंनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे इंदिरा गांधी काही प्रसंगी कठोर प्रशासक तसेच मुत्सद्दी राजकारणी म्हणून घडण्यामध्ये मोलाचा वाटा होता. 

     डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी इंदिरा गांधीनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा आढावा घेतला. यामध्ये आर्थिक विषमता कमी करण्यासाठी त्याने बँकांचं राष्ट्रीयीकरण करणे यामधील भूमिका स्पष्ट केली. तत्कालीन आर्थिक आणि राजकीय परिस्थितीला तोंड देण्याच्या हेतूने त्यांनी गरीबी हटाव हा नारा देऊन २० कलमी कार्यक्रम जाहीर केला.  १९७१ चे युद्ध हे इंदिरा गांधींच्या सर्वोच्च राजनीति मधील मुत्सद्दीपणाचा विजय होता . संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, १९७४ चा पोखरण येथील आण्विक बॉम्बचा प्रयोग याचा विचार करता इंदिरा गांधी ह्या सर्वसामान्य माणसांच्या बद्दल कळवळा असणाऱ्या राष्ट्रीय नेत्या होत्याच मात्र भारताचे सौरभौमत्व अबाधित राखण्याचे हेतूने कणखर भूमिका घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेत्या होत्या असे सांगितले. 

  संयोजक व अध्यक्ष राजीव गांधी स्मारक समिती पुणे यांनी इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. आभार प्रदर्शन श्री जगताप यांनी केले.
 
Top