पुणे दि.२४/१०/२०२० - वनाधिपती,महाराष्ट्राचे माजी मंत्री, विचारवंत, अभ्यासक विनायकराव पाटील यांचे दि २४ ऑक्टोबर, २०२० रोजी धक्कादायक निधन झाले.गेली अनेक वर्ष त्यांचा आणि माझा परिचय होता. अत्यंत उत्कर्ष वाचन, संवेदनशीलता, सहृदयता व एका बाजूला खूप विचार करत असताना त्या विचाराची गांभीर्याची छाया स्वतःच्या व्यक्तिमत्ववर न येऊ देता सहजगत्या प्रत्येकाशी संवाद साधण्याची त्यांची हातोटी होती. त्याचबरोबर जीवनाकडे बघण्याचा अत्यंत आशादायी दृष्टिकोन, वनांच्या संदर्भात प्रेम आणि बांधिलकीतुन त्यांनी केलेले परिश्रम अशी श्री.पाटील यांच्या स्वभावाची अनेक वैशिष्ट्ये होती.

१९९० च्या सुमाराला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे काम करायला मी सुरवात केली. श्री पाटील आणि माझा अधिक परिचय झाला. त्यांनी मला नाशिकला कार्यक्रमालाही मला बोलावले होते. त्याचबरोबर स्त्री आधार केंद्र आणि इतर काही कार्यक्रमांना मी त्यांना निमंत्रण दिले होते. गावातील एक सामान्य माणसाची मानसिकता समजून घेण्याबरोबर उद्योगधंदे असतील,साखर कारखानदरी असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे शहरीकरणाचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या सगळ्यांबद्दल अत्यंत चांगल्या प्रकारेच समज श्री पाटील यांच्या संपूर्ण विचारां मध्ये आणि कृतीमध्ये होती.

ज्यावेळी मला नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय यांनी आदर्श आमदार म्हणून गौरवले होते. त्या कार्यक्रमालासुद्धा खास विनायकराव पाटील यांना विशेष निमंत्रित केले गेले होते.या कार्यक्रमात सूंदर,भावपूर्ण उद्गार माझ्याबद्दल त्यांनी कार्यक्रमात व्यक्त केलेले होते,असा राजकीय विचारांच्या पलीकडे मैत्री जपणारा श्री.पाटील यांचा स्वभाव होता.

    विनायकराव पाटील यांच्या धक्कादायक आणि दुःखद निधनामुळे महाराष्ट्र एक वेगळ्या प्रकारच्या राजकीय, सामाजिक गौरवशाली परंपरेला मुकणार आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या समवेत माझे अनेक वर्षाचा परिचय होता. नाशिक आणि महाराष्ट्रात विनायकराव पाटील यांच्या निधनामुळे फार मोठी हानी झालेली आहे आणि त्याची उणीव कायम स्वरूपी आम्हाला भासत राहील. विनायकराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

ना.डॉ.नीलम गोऱ्हे,
उपसभापती- विधानपरिषद,
महाराष्ट्र राज्य.
 
Top