घाट बांधणी कामाच्या ठेकेदारावर व जबाबदार अधिकाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
पंढरपूर, १५/०८/२०२०-पंढरपूर शहरात काल कुंभार घाट येथे बांधकाम सुरु असेलल्या घाटाची भींत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ निष्पाप नागिरकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सदर घाटाचे काम अतिशय निकृष्ट पध्द्तीने होत असल्याची तक्रार शिवसेनेच्यावतीने काही महिन्यापूर्वीच करण्यात आली होती.मात्र तत्कालीन फडणवीस सरकारकडे या ठेकेदारा साठी आग्रही असेलल्या एका आमदाराने पाठराखण केल्यामुळेच व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याशी ठेकेदाराशी मिलीभगत असल्याने निकृष्ट पद्धतीने काम केले जात असतानाही डोळेझाक करण्यात येत होती.आता या निकृष्ट कामामुळेच ६ जणांचा हकनाक बळी गेला असून सदर प्रकरणी ठेकेदार व सदर कामाची जबाबदार असणारे प्रशासकीय अधिकारी यांच्यावर भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करावा .या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चंद्रभागा नदीकाठी जलसंपदा विभागाच्यावतीने नव्याने घाट बांधणीचे काम गेल्या दोन वर्षपासून सुरु आहे. सदर काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी विविध व्यक्ती,संस्था, संघटना यांनी तक्रारी केल्या होत्या.

    शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही सदर गंभीर बाब जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून देण्यात आली होती.मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले.सदर दगडी घाट बांधणीसाठी मातीचा वापर भर म्हणून करण्यात येत होता.नव्याने बांधण्यात आलेली ही घाटाची दगडी भिंत कोसळून ६ निष्पापांचा बळी गेला असून ही बाब अतिशय वेदनादायक आणि संबंधित ठेकेदार , प्रशासकीय अधिकारी यांच्या अनास्थेचे,हलगर्जीपणाचे प्रतीक आहे. सदर घटनेस पूर्णतः ठेकेदार व अक्षम्य दुर्लक्ष करणारे संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे आपण या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन सदर प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत व या नव्याने होत असलेल्या घाट बांधणीच्या कामाची सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आपण शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिली आहे.
 
Top