सामाजिक घटना व घडामोडींचे प्रतिबिंब साहित्यात उमटते

पंढरपूर – “साहित्य हे समाज बदलाचे माध्यम असते. सामाजिक घटना व घडामोडींचे प्रतिबिंब साहित्यात उमटते. मराठी ग्रामीण साहित्याने महाराष्ट्रातील दुष्काळ ते जागतिकीकरण असे विषयी हाताळले. मात्र शेतकरी आत्महत्या हा विषय अद्याप ही गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. कृषीमूल्य आधारित अर्थव्यवस्था निर्माण न झाल्यामुळे शेतकरी जीवनाची झालेली वाताहत याचे चित्रण मराठी साहित्यात फारसे आले नाही. सुरुवातीच्या काळात मराठी ग्रामीण साहित्य हे अभिजन लेखकांची निर्मिती होती; मात्र साठोत्तरी कालखंडात प्रत्यक्ष ग्रामीण जीवन अनुभवलेल्या लेखकांनी लेखन केल्यामुळे त्यात अस्सलपणा आला. काळानुरूप बदललेले ग्रामवास्तव आले.” असे प्रतिपादन काशी हिंदू विश्वविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक डॉ. नामदेव गपाटे यांनी केले.

     रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रुसा २ काम्पोनंट – ८ अंतर्गत मराठी विभागाच्या वतीने ‘ग्रामीण साहित्य- दिशा आणि अपेक्षा’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बीजभाषण करताना ते बोलत होते. या कार्यक्रम अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे हे होते.  

     या चर्चासत्राचे तज्ज्ञ मार्गदर्शक श्रीरामपूर येथील ग्रामीण साहित्य समीक्षक डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले की, “महात्मा जोतीराव फुले यांनी निर्माण केलेल्या साहित्यातून ग्रामीण भागातील शेतकरी जीवन व त्यांच्या समस्या चित्रित केल्या गेल्या. त्याचा प्रभाव पुढील ग्रामीण साहित्य निर्मितीवर दीर्घकाळ झाला. वर्तमानात लेखकांची जबाबदारी वाढत आहे.समकाळातील प्रश्न त्यांनी साहित्यातून मांडले पाहिजेत. त्याचबरोबर आज ग्रामीण साहित्य चळवळ अधिक वाढण्यासाठी शासनाने ग्रामीण साहित्य संमेलनासाठीही भरीव स्वरुपात निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.”
 
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे म्हणाले की, “रयत शिक्षण संस्था आणि ग्रामीण भाग यांचा खऱ्या अर्थाने ऋणानुबंध आहे. खेड्या तील माणसांचा विकास झाला पाहिजे.यासाठी तेथे शिक्षणाची सुविधा निर्माण करून देण्याचे काम रयतने केले. ग्रामीण भागातील तरुणांना बोलते आणि लिहिते करण्याचे काम रयतच्या माध्यमातून झाले आहे. ”

  या चर्चासत्राचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मराठी विभागप्रमुख डॉ.राजाराम राठोड यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ.रमेश शिंदे यांनी केले. या चर्चासत्रासाठी रयतचे ऑडीटर प्राचार्य डॉ.शिवलिंग मेणकुदळे, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, प्रा.डॉ.बाबासाहेब शेंडगे,प्रा.डॉ. सुभाष आहेर,प्रा.डॉ.भारती रेवडकर,प्रा.डॉ. महादेव देशमुख,डॉ.विजय कुंभार यांचेसह पाचशेहून अधिक प्राध्यापक,अभ्यासक उपस्थित होते. 

  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुसा समन्वयक डॉ.बजरंग शितोळे, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ.अमर कांबळे, कार्यालयीन प्रमुख अनंत जाधव, डॉ.दत्तात्रय डांगे,डॉ. समाधान माने,प्रा.राजेंद्र मोरे, अभिजित जाधव यांनी सहकार्य केले. उपस्थितांचे आभार प्रा. सुभाष कदम यांनी मानले. 
 
Top