महिलांवर अत्याचार करणारा सराईत आरोपी जेरबंद

पालघर,३०/१०/२०२० - महिलांवर अत्याचार करून त्याचे अश्लील व्हिडिओ तयार करून इंटरनेटवर अपलोड करणाऱ्या सराईत आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.पालघर जिल्ह्यातील विक्रमगड पोलीस ठाणे येथे या गुन्ह्यातील फिर्यादी महिला यांना फूस लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ तयार करून सदरचे व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केल्याने आरोपी मिलिंद अनिल झडे वय ३२ वर्षे , राहणार मुक्काम पोचाडे , तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलांवर अत्याचार करणारा वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हे दाखल झाल्यापासून विक्रमगड परिसरातील डोंगरात व जंगलात वास्तव्य करून राहत असल्याने तो मिळून येत नसल्याने पोलीस अधीक्षक पालघर यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याकामी प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा ,पालघर यांना आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी पथक तयार करून आरोपीचे सध्याच्या ठिकाणाची माहिती घेऊन कसोशीने शोध चालू केला.आज रोजी वरील गुन्ह्यातील आरोपी मिलिंद अनिल झडे हा पाचमाड येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी पथकासह सापळा रचून त्यास पाचमाड नाका येथे ताब्यात घेतले आहे.

  सदरची कारवाई पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक पालघर प्रकाश गायकवाड ,पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र नाईक यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड पोलिस हवालदार दीपक राऊत, संदीप सरदार, संदीप सूर्यवंशी, पोलीस नाईक नरेंद्र पाटील यांनी केली आहे.
 
Top