बचाव पथकाने केली नागरिकांची सुखरुप सुटका



पंढरपूर, दि.१६/१०/२०२० - अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.नीरा व भीमा नदीकाठी पुरस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागासह ४ हजार कुटुंबातील १६ हजार नागरिकांचे प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे.पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांचेसह नगरपालिका प्रशासनानेही या परिस्थितीत विशेष प्रयत्न केले असून मदत व बचाव कार्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.


   अतिवृष्टीमुळे तसेच भिमा व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्याने नदीकाठी पुर परस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.अतिवृष्टीमुळे शहरासह तालुक्या तील ९५ गावे बाधित झाली असून, तालुक्यातील ३३०५ कुटुंबाच्या घरात पाणी शिरले आहे.अतिवृष्टीमुळे पंढरपूर शहरात ६ तर भंडीशेगांव येथील १ अशा सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील ४४० घरांची पडझड झाली असून ४ बंधाऱ्याचे नुकसान झाल्याचेही प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.

    शहरातील अंबाबाई पटांगण, व्यासनारायण झोपडपट्टी परिसर,लखुबाई मंदीर परिसरातील नागरिकांना केंद्रे महाराज मठ, सारडा भवन, तनपुरे महाराज मठ, लोकमान्य शाळा, चैतन्य महाराज मठ,गंगागिरी मठ तसेच पर्यटक निवास येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या नागरिकांना विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीमार्फत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

    तालुक्यातील नागरिकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,समाज मंदिरे,मंदिरे आदी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.या ठिकाणी प्रशासनामार्फत आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.आरोग्य विभागामार्फत आवश्यक आरोग्य पथकासह औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.पूरस्थितीत नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहनही प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

बचाव पथकाने केली नागरिकांची सुखरुप सुटका
जिल्ह्यासह तालुक्यात अतिवृष्टीमुळे तसेच धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे नदी पात्रात पाण्याचा प्रवाह मोठ्या तीव्रतेने सुरु आहे. नदी पात्राच्या काठावरील कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम प्रशासनाच्या व बचाव पथकाच्या मदतीने सुरु आहे. तालुक्यातील सरकोली येथील तीन नागरिकांना आज वजीर रेसक्यु फोर्सच्या मदतीने नदीच्या पाण्यातून सुखरुप बाहेर काढले आहे. तसेच कौठाळी येथून व्हाईट आर्मीच्या मदतीने नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याचे तहसिलदार वैशाली वाघमारे व गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी सांगितले
 
Top